आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालयात बसूनच आखली गेली पूररेषा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिकेने 2008मध्ये तयार केलेली पूररेषा तत्कालीन सत्ताधार्‍यांनी स्वार्थासाठीच तयार केली आहे. कर्मचारी-अधिकार्‍यांनीही घटनास्थळी न जाता कार्यालयात बसूनच ती तयार केल्याने शहराचा विकास खुंटल्याचा आरोप महापौर अँड. यतिन वाघ यांनी रविवारी केला.

भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या नाशिक शाखेच्या वतीने पंडित पलुस्कर सभागृहात आयोजित केलेल्या एकदिवसीय पूररेषा चर्चासत्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. महापौर पुढे म्हणाले की, खरं तर 2008 मध्ये जो महापूर आला होता, तो मानवनिर्मित होता. ते वेळोवेळी शासनास सांगतही होतो. मात्र, शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. आता ही बाब शनिवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनीच मान्य केली आहे. त्यामुळे ही पूररेषा तत्काळ रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. याबाबतचा ठराव महापालिकेने शासनाकडे पाठविला आहे. पालिकेने आपली जबाबदारी पूर्ण केली आहे. शासनाने आता त्यांची जबाबदारी पार पाडावी.

या वेळी नगरसेवक शाहू खैरे म्हणाले की, स्थानिक पदाधिकार्‍यांना विश्वासात न घेताच पूररेषा तयार केल्याचा आक्षेप घेतला. पूररेषेच्या चुकीच्या आखणीमुळे जुन्या नाशकातील व गावठाणातील घरांची किंमत शून्य झाली. घरांच्या दुरुस्ती व बांधकामासाठी पालिकेकडून परवानगी आणि पूर्णत्वाचा दाखलाही मिळत नाही. त्यामुळे नवीन बांधकाम करता येत नाही. त्यासाठी पालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व सेवाभावी संस्थांनी एकत्र येऊन पूररेषेची नव्याने आखणी करण्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. दिलीप आहिरे यांनी स्वागत केले. सूर्यकांत रहाळकर यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र निकम यांनी आभार मानले. या वेळी स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे, नगरसेवक गुरुमित बग्गा, सुधाकर बडगुजर, नगरसेविका सुनीता शिंदे, एन. एम. आव्हाड आदी उपस्थित होते.

पूररेषेची आखणी काळजीपूर्वक करावी
डॉ. दत्ता देशकर याप्रसंगी म्हणाले की, पाऊस हा पूर्वीप्रमाणेच पडत असून, त्याचे केवळ दिवस कमी झाले. त्यामुळे पूर येण्याची शक्यता वाढली आहे. त्यासाठी पूररेषा काळजीपूर्वक आखणे गरजेचे आहे. डॉ. सुनील कुटे म्हणाले, पूररेषेची आखणी करताना सिव्हिल इंजिनिअर, बिल्डर्स व विविध क्षेत्रांत काम करणार्‍या नागरिकांनी एकत्र येऊन पूर्वी आलेले महापूर लक्षात घेऊन पूररेषेची आखणी करावी. म्हणजे पुराचे नियंत्रण करता येईल. डॉ. अनिल जगदाळे आणि प्रा. उदय गायकवाड यांनी कोल्हापूरच्या धर्तीवर नाशिकची पूररेषा आखल्यास पुराचे नियंत्रण करणे सोपे होणार असल्याचे मत व्यक्त केले.

नद्यांची स्वच्छता व्हावी
पूररेषा हा विषय दुर्लक्षित असला तरीही मानवी समाजजीवनाशी निगडित असल्याने महापालिकेने त्यात लक्ष घालणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी जलसंपदा सचिव डॉ. दि. मा. मोरे यांनी केले. पूररेषेची आखणी पाटबंधारे विभागाच्या अधिपत्याखाली स्थानिक स्वराज्य संस्थांनी करण्याचाही सल्ला त्यांनी दिला. महाराष्ट्रातील धरणे हैदराबादच्या धर्तीवर पूरनियंत्रणासाठी बांधली नसून, ती पाण्याची साठवणूक करण्यासाठी बांधली आहेत. ती भरल्यानंतर पूर येणारच, त्यासाठी नद्यांची स्वच्छता महत्त्वाची असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या नाशिक शाखेने पूररेषेसंदर्भात चर्चासत्राचे आयोजन करून प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण काम केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.