आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरणपूररोड आता फूल‘वाटिका’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अफाट रहदारी, बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक कोंडीने शहरातील सर्वच रस्त्यांना ग्रासले असताना नाशिककरांना प्रसन्न मनाने हवाहवासा वाटणारा स्वप्नवत प्रवास महिनाभरात करता येणार आहे. शरणपूररोडवर याची अनुभूती येणार आहे. सीबीएस ते कॅनडा कॉर्नर या 2600 मीटर रस्त्याच्या दुतर्फा ‘फ्लॉवरबेड हेजेस’ तंत्राचा वापर करून शोभिवंत फुलझाडे लावण्यात येणार आहेत. आकर्षक रोषणाईची झळाळीही या रस्त्याला मिळणार असल्याने वाहन चालवण्याबरोबरच पायी भटकंती करण्याची मजा काही वेगळीच राहणार आहे. तसेच, नाशिकची कधीकाळी असलेली ‘गुलशनाबाद’ ही ओळखही ताजी होणार आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात 400 कोटींची नवीन रस्त्यांची कामे सुरू असताना महापालिकेच्या अंदाजपत्रकातून तयार होणारा हा रस्ता नाशिकच्या वैभवात शिरपेच खोचणारा ठरणार आहे. नाशिकमधील या पहिल्या-वहिल्या प्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे महानगराचे कामकाज चालणार्‍या महापालिका मुख्यालयासमोरूनच जाणार आहे. जवळच पोलिस कवायत मैदान हा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची नेहमीच वर्दळ असणारा परिसर आहे. शिवाय सीबीएससारखे शहरातील महत्त्वाचे प्रवासी स्थानक असल्यामुळे नाशिकची कीर्ती सर्वदूर पोहोचण्यास मदत होणार आहे.
सध्याची स्थिती काय?
सद्यस्थितीत सीबीएस ते राजीव गांधी भवन, तसेच राजीव गांधी भवन ते कॅनडा कॉर्नरपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. आता त्यावर अखेरची पॉलिशिंग सुरू असून लवकरच हा रस्ता चकचकीत होईल. यानंतर याठिकाणी फुलांचे ताटवे उभारले जाणार आहेत.