आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार नवीन पूल साकारणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-वाहतुकीच्या खोळंब्यापासून शहरवासीयांची मुक्तता व्हावी, यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात नवीन चार ठिकाणी पूल बांधण्याची योजना तयार केली आहे. यात चोपडा नाल्याजवळ, सिटी सेंटर मॉलजवळ, नळे मळा, मखमलाबादरोड येथील पुलांचा समावेश आहे. या पुलांच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्णत्वास आली असून, येत्या 15 दिवसांत प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. वर्षभरात हे सर्व पूल वाहतुकीसाठी खुले होतील, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातून अंतर्गत व बाह्य रिंगरोड तयार करण्यात येणार आहेत. या रोडच्या कामाला सुरुवातही झाली आहे. या कामाचाच एक भाग म्हणून शहरात नव्याने चार पूल साकारण्यात येणार आहेत. इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूने आणि चोपडा नाल्याजवळ सध्या पूल अस्तित्वात आहे; परंतु हा पूल सिंहस्थ काळात अपुरा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच ठिकाणी दुसरा समांतर पूल बांधण्यात येणार आहे. यासह चारही पुलांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

अल्प कालावधीत काम पूर्ण करायचे असल्याने पूल बांधकामाची जबाबदारी घेण्यास ठेकेदार पुढे येत नव्हते, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. तीन वेळा फेरनिविदा काढल्यानंतर ठेकेदार निश्चित करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

बिन रस्त्यांच्या पुलांना बारा वर्षांची प्रतीक्षा : सिंहस्थकाळात नाशिक शहराप्रमाणेच त्र्यंबकेश्वरलाही तोबा गर्दी होत असल्याने त्र्यंबककडे जाणारे रस्ते तुडुंब भरलेले असतात. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वरला जोडणारे रस्ते शहराच्या मध्यवर्ती भागातूनच जात असल्यामुळे ऐन सिंहस्थात शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी सिडकोतील मनोहरनगर ते महात्मानगर असा रिंगरोड तयार करण्यास 13 वर्षांपूर्वी महासभेची मंजुरी घेण्यात आली होती. त्यानुसार उंटवाडी परिसरात दीड कोटी रुपये खर्च करून पूल बांधण्यात आला, परंतु या पुलाला जोडणार्‍या रस्त्याचे भूसंपादनच न करण्यात आल्यामुळे हा पूल गेल्या सिंहस्थापासून बेवारस अवस्थेत पडून आहे.

याचप्रमाणे नाशिकरोड येथील रोकडोबावाडी ते वडनेर रोड यांना जोडणारा पूलदेखील गत सिंहस्थापासून रस्त्यांच्या अभावी अधांतरी आहे. गंगापूररोड येथील संत आसारामबापू आर्शम ते चांदशी गावाला जोडण्यासाठी आर्शमाजवळ सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून पूल बांधण्यात आला होतो; परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे बारा वर्षे या पुलाला रस्त्याचा जोड मिळाला नव्हता. त्याचप्रमाणे सुयोजित संकुलाजवळील कै. उत्तमराव चव्हाण पुलाजवळील रस्त्याचीही जागा देखील भूसंपादीत झालेली नाही. तपोवनातून टाकळीकडे जाणार्‍या पुलालादेखील यंदाच्या सिंहस्थापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. नाशिकरोड येथीलच बागूलनगर ते गाडेकर मळा परिसराला जोडणारा पूल सन 2000पासून रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहे. एकंदर बिन रस्त्याचे हे चार पूल प्रतीक्षेत असतानाच आता आगामी सिंहस्थाच्यादृष्टीने नवीन चार पूल नाशिक शहराला लाभणार आहेत.

  • इंगळे कॉटेज परिसर (सिटी सेंटर मॉलजवळ)
  • नळे मळा (लेखानगर)
  • गुंजाळ बाबानगर (मखमलाबाद शिवार)
  • मंडलिक व काकड मळा परिसर (मखमलाबादरोड)