आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला चला निवडणूक अाली, देवदर्शनाची वेळ झाली, मतदारसंघातील ज्येष्ठांवर केंद्रित केले लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दिवाळीच्या सुटीनंतरही राज्यातील धार्मिक स्थळांवर यंदा भाविकांची गर्दी दिसत असून, त्यात विशेषत: ज्येष्ठ नागरिकांचा समावेश अाहे. अर्थात, ही गर्दी कुठल्या सण वा उत्सवामुळे हाेताना दिसत नाही, तर महापालिकेच्या अागामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी मतदारांना धार्मिक स्थळांवर घेऊन जाणे सुरू केले अाहे. दिवाळीत दाखविल्या जाणाऱ्या एका जाहिरातीच्या पार्श्वभूमीवर अाता ‘चला चला निवडणूक अाली, देवदर्शनाची वेळ झाली’ असे कुणी इच्छुकाने म्हटल्यास नवल वाटू नये!
नवीन प्रभागरचनेनुसार यंदा चार वाॅर्डांचा एक प्रभाग झाल्याने प्रत्येक प्रभागाची व्याप्ती कमालीची वाढली अाहे. दांडगा जनसंपर्क अाणि अनुभव असलेल्या पुढाऱ्यांचीच डाळ यंदा शिजेल असे दिसते. त्यामुळे प्रत्येक इच्छुक अातापासूनच अापापल्यापरीने मतदारांना अाकर्षित करण्याचा प्रयत्न करीत अाहेत. प्रत्येक सण-उत्सवाला हाेणारे कार्यक्रम, मैफली अाणि मेळावे हे निवडणुकीचीच साक्ष देत अाहेत. त्याचा पुढचा टप्पा म्हणून इच्छुकांनी नेहमीप्रमाणे ज्येष्ठांवर लक्ष केंद्रित केले अाहे. नाशिक शहरात ज्येष्ठांची संख्या माेठ्या प्रमाणात अाहे. त्यातही ज्येष्ठ नागरिक संघाची संख्याही माेठी असल्याने एकत्रितरीत्या ही मंडळी भेटणे साेयीस्कर जाते. ही बाब लक्षात घेत अनेक इच्छुकांनी अाता ‘देवदर्शनाच्या’ सहली घेऊन जाणे सुरू केले अाहे. त्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ वा हास्य क्लबच्या सदस्यांना एकत्रित करून मांगीतुंगी, पंढरपूर, काेल्हापूर, तुळजापूर, तिरुपती बालाजी, हरिहरेश्वर अशा धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जात अाहेत. त्यासाठी विविध ट्रॅव्हल बसचा वापर करण्यात येत अाहे.
अाचारसंहितेपूर्वी सहली
अाचारसंहिता जाहीर झाल्यावर मतदारांना प्रलाेभन देणे हा गुन्हा ठरताे. त्यामुळे अाचारसंहिता जाहीर हाेण्याच्या अातच इच्छुक मंडळी मतदारांना धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळांच्या सहली घडवित असल्याचे दिसते.

महिलावर्गाचे पर्यटन
ज्येष्ठांना धार्मिक पर्यटन घडविले जात असताना, दुसरीकडे महिलावर्गालाही सहलीसाठी नेले जात अाहे. अाजवर काही इच्छुकांनी भंडारदरा, ताेरणमाळ, खंडाळा, लाेणावळा, काेकण अादी भागांत सहली काढल्या अाहेत.

सहलीनंतर इतरांच्या नाराजीचा धाेका
धार्मिकस्थळांच्या विनाशुल्क भेटी घडवून दिल्यानंतर संबंधित मतदार खुश हाेऊन अापल्याला मतदान करतील, असा समज इच्छुकांचा अाहे. मात्र, ज्या ज्येष्ठ नागरिकांना सहलीला जाण्याची संधी मिळत नाही त्यांची मते मात्र गमविण्याची दाट शक्यता अाता निर्माण झाली अाहे. सहल झाल्यावर इतर ज्येष्ठांकडून येणाऱ्या नाराजीच्या प्रतिक्रियांमुळे संबंधित इच्छुक अाता डाेक्याला हात लावून बसलेले अाहेत.
बातम्या आणखी आहेत...