आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात पसरले धुळीचे लाेट, वा-याचा वेग हाेता ताशी १२ किलोमीटर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: शहरासह परिसरात रविवारी जाेरदार वाऱ्यामुळे धुळीचे लाेट पसरले हाेते. यामुळे सर्वत्र धूळच धूळ झाली हाेती.
नाशिक - शहर परिसरात रविवारी जाेरदार वा-यासह धुळीचे लाेट पसरले हाेते. शनिवारी मध्यरात्रीपासूनच वा-याचा वेग ताशी ११ ते १२ किलोमीटर झाल्याने रविवारी शहरात ‘डस्ट हेज’ निर्माण झाले होते. शहरात सर्वत्र धूळच धूळ दिसत असल्याने शहरवासीयांना धुळीचा सामना करावा लागला.
मार्च महिन्यात १३ आणि १४ मार्च रोजी अवकाळी पाऊस झाल्यानंतर माती जमिनीला चिकटून होती. मात्र, त्यानंतर उन्हाची तीव्रता वाढल्याने जमीन पूर्णपणे कोरडी झाली आहे. रविवारी सकाळपासूनच वारे वाहत असल्याने ही कोरडी पडलेली माती उडत असल्याने दुचाकीस्वारांना वाहने चालविणे कठीण जात होते. नाशिकरोड, इंदिरानगर, पाथर्डी फाटा, डीजीपीनगर, राणेनगर, पंचवटी, सिडको, कामटवाडा, गंगापूररोड, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, उपनगर या भागात धुळीचे लोट दिसत होते. तर, एकलहरे परिसरात वा-याच्या वेगामुळे आैष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पातील राख उडत असल्याने येथील नागरिकांना धुळीचा राखेचा त्रास झाला.

आखाती भागात धुळीचे मोठे वादळ निर्माण झाल्याने ते अरबी समुद्र पार करून राज्यात दाखल झाले. यामुळे वा-याच्या वेगात वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र धूळ दिसत होती. तसेच यापूर्वीही असे प्रकार झाल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले. तसेच दुबईमधील चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचे शहरात सर्वत्र चर्चा होती.

हे करावे उपाय
धुळीतूनघरी गेल्यास नाकात गायीचे तूप दोन थेंब सोडावे. तोंडाला रुमाल किंवा मास्क लावणे, सुती कपड्याचा वापर करणे जेणेकरून घामावर धूळ आणि प्रदूषित घटक बसणार नाही. डोळे स्वच्छ आणि थंड पाण्याने धुवावेत.

संसर्गजन्य आजाराची शक्यता
धुळीमुळे खोकला, रेतीचे कण डोळ्यात जाऊन डोळे चोळल्यास रक्तस्त्राव, शिंका येणे, डोके दुखणे असा त्रास हाेताे. तसेच, संसर्गजन्य आजाराची शक्यता असते. -डॉ. राहुल सावंत, आयुर्वेदाचार्य

लेन्सधारकांनी घ्यावी काळजी
धुळीमुळेकॉन्टॅक्ट लेन्स वापरणा-यांची अधिक गैरसोय होते. डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे तसेच इन्फेक्शन होण्याचे अधिक प्रमाण असते. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी लेन्सएेवजी गाँगल वापरावा. - डाॅ.नानासाहेब खरे, नेत्ररोगतज्ज्ञ