आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Food Drug Administration Raid On Shops In Nashik

डीबी स्टार इम्पॅक्ट: मुदतबाह्य वस्तू विकणाऱ्या दुकानांवर ‘एफडीए’चे छापे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील रविवार कारंजासह इतर भागातील दुकानांवर अन्न आैषध प्रशासन (एफडीए)तर्फे बुधवारी छापे टाकून विविध खाद्यपदार्थ, वस्तूंचे नमुने घेण्यात आले. शहरातील काही प्रमुख दुकानांसह गल्लीबोळांतील काही दुकानांतही मुदतबाह्य खाद्यपदार्थ इतर वस्तूंची विक्री केली जात असल्याची बाब ‘दिव्य मराठी’च्या ‘डी. बी. स्टार’ चमूने ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे उघडकीस आणल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, अन्न आैषध प्रशासनातील कामचुकार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी आम आदमी पक्षाकडून शुक्रवारी (दि. ३) आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
नफा कमावण्याच्या उद्देशाने काही दुकानदार मुदतबाह्य गृहाेपयाेगी खाद्यपदार्थ इतर वस्तूंची विक्री करीत असल्याने नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याची धक्कादायक बाब ‘डी. बी. स्टार’ला आढळून आली होती. या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी ‘डी. बी. स्टार’ चमूने शहरातील काही भागातील नामांकित किराणा दुकानांत काही वस्तू खरेदी केल्यानंतर या प्रकारावर शिक्कामोर्तब झाले होते. याबाबतचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध होताच अन्न प्रशासनाने रविवार कारंजा परिसरासह इतर भागातील दुकानांवर छापे टाकून खाद्यपदार्थ वस्तूंचे नमुने घेतले. मुदतबाह्य पोहे विकणाऱ्या रविवार कारंजावरील संबंधित दुकानांवर कारवाई करत पोह्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
‘आप’ उतरणार रस्त्यावर : दरम्यान,मुदतबाह्य खाद्यपदार्थांच्या विक्रीवर ‘डी. बी. स्टार’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर शहरातील अनेक संस्थांनी अशा दुकानांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे या सर्वसामान्यांशी निगडित गंभीर प्रकाराची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी आम आदमी पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे पक्षाचे जिल्हा समन्वयक जितेंद्र भावे यांनी सांगितले.
प्रशासनाने कडक कारवाई करावी
- अन्न औषध प्रशासन विभागातील अधिकारी फक्त पगार घेतात आणि काम करण्यास मात्र टाळाटाळ करतात. त्यामुळे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून तातडीने कडक कारवाई झालीच पाहिजे.
जितेंद्र भावे, जिल्हा समन्वयक, आप