नाशिक - सुरगाणा धान्य घोटाळ्यापाठोपाठ उघडकीस आलेल्या कोट्यवधींच्या धान्य घोटाळ्याप्रकरणी ‘मोक्का’खाली गुन्हा दाखल असलेल्या फरार मुख्य संशयित घोरपडे बंधूंसह इतर दोघा संशयितांनी अखेर सहा महिन्यांनंतर रविवारी पोलिसांसमोर शरणागती पत्करली.
संशयितांच्या कोट्यवधींच्या मालमत्ता जप्त करत त्यांच्या कुटुंबीयांवरही गुन्हे दाखल करण्याची तयारी यंत्रणेने करताच पोलिसांसमोर हजर होण्याशिवाय पर्यायच उरला नसल्याने संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, रमेश पाटणकर, मदन पवार हे चौघे पोलिसांना शरण आले. संशयितांना सोमवारी (दि. ३०) विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, यातील अरुण नामदेव घोरपडेसह आणखी तिघे फरार असून, तेही लवकरच हजर हाेतील, अशी शक्यता तपासी अधिकाऱ्यांनी वर्तवली.
काळ्या बाजारात सरकारी धान्य विक्रीचा प्रकार ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणात शासन आदेशानुसार उपअधीक्षक सी. एच. देवराज यांनी संपत घोरपडेसह अरुण घोरपडे, विश्वास घोरपडे इतर दोघांविरुद्ध जून २०१५ रोजी मोक्काअन्वये गुन्हा दाखल केला. मात्र, संशयितांना पकडण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरत असतानाच घोरपडे बंधूंनी जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही संशयित पोलिसांत हजर झाल्याने त्यांची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी यंत्रणेने न्यायालयात अर्ज केला. यामध्ये माथाडी कामगार असलेल्या घोरपडे यांनी पंधरा वर्षांत १५ हजारांवरून १७० कोटींची मालमत्ता कमाविल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
न्यायालयाने संबंधित मालमत्ता जप्तीचे जिल्हा प्रशासनाला आदेश देत संशयितांना हजर होण्याची मुदत दिली. तरीही संशयितांनी न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करताच प्रशासनाने त्यांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू केली. महिन्याभरात शेती, प्लॉट, ट्रक, कार, रेशन दुकाने अशी सुमारे कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. संशयितांसोबत त्यांच्या संपर्कात असलेले आणि व्यवसायात भागीदारी असणाऱ्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला. यामध्ये घोरपडे यांची कन्या पूनम होळकर आणि व्यापारी लखनसिंग पटेल, जितूभाई ठक्कर (रा. ठाणे) यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी पटेल यास अटक करण्यात आली असता, उर्वरित संशयितांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून व्यूहरचना आखली जात होती. तोच घोरपडे बंधू, पाटणकर, पवार हे तपासी अधिकारी देवराज यांच्यासमोर हजर झाले.