आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Foolness : Nashik Corporation Distributing School Dress

वेडेपणाचा कळस : ऐन सुट्ट्यात नाशिक महापालिका करतेय गणवेश वाटप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ऐन सुट्यांच्या कालावधीत महापालिकेने आपल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करून एकप्रकारे त्यांची थट्टाच सुरू केली आहे. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाजतगाजत विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या हाती गणवेशाची भेट देण्याबाबतचे निर्देश असूनही गेल्या तीन वर्षांपासून विलंबाची परंपरा असलेल्या प्रशासनाला यावर्षी तर थेट शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही उपरती सुचली आहे.

आर्थिक स्थिती हलाखीची असलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात मिळावा आणि शाळेची पटसंख्या टिकून राहावी, या मुख्यत्वे दोन कारणांनी शालेय गणवेश वाटप योजना सुरू करण्यात आली. मात्र, प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री रेघोट्या मारणार्‍या आणि या खरेदीवरून राजकारण करणार्‍यांना याचे काहीच सोयरसुतक उरलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रात तर जाऊ द्या; परंतु त्यानंतर दिवाळीतदेखील महापालिका सलग दोन वर्षे विद्यार्थ्यांना गणवेश देऊ शकलेली नाही. आता 2012-13 मध्येही ही परंपरा प्रशासनाच्या कारभार्‍यांनी सुरूच ठेवली आहे. ऐन सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश वाटप सुरू केल्याने त्याचा प्रत्यय येत आहे. दोन वर्षांपूर्वी ज्या संस्थेने गणवेश देण्यास विलंब केला, त्याच ठाणे येथील कलावती महिला मंडळाला हा ठेका देण्यात आला. विशेष म्हणजे, या संस्थेला महापालिकेने दंड करून काळ्या यादीत टाकण्यापर्यंत कारवाईदेखील केली होती. परंतु, सत्तेपुढे शहाणपण टिकत नाही. त्याप्रमाणे शासनाकडून पुन्हा याच संस्थेला ठेका देण्याविषयी परिपत्रक काढले आणि महापालिकेनेही इमाने इतबारे शासनाच्या आदेशाचे कायदेशीर मार्गाने पालन केले.

सदस्यांना खरेदीची घाई : महापालिका शिक्षण मंडळावर नियुक्त झालेल्या सदस्यांनाही गणवेश आणि स्कूल शूज खरेदीची घाई झाली आहे. शिक्षण मंडळाकडील खरेदीचे आयुक्तांनी काढून घेतलेले अधिकार पूर्ववत द्यावे, अशा मागणीचे पत्र या सदस्यांनी प्रशासनाला दिले आहेत. कोट्यवधींच्या खरेदीतून अर्थकारण करता येत असल्यानेच या खरेदीकडे मंडळाचे बारकाईने लक्ष असते. 2011 मधील खरेदीत गैरप्रकार घडल्यानेच आयुक्त खंदारे यांनी हे अधिकार भांडारगृह विभागाला दिले होते.

सुटीत स्कूल शूज खरेदी : वादग्रस्त शालेय गणवेश खरेदीनंतर आता महापालिकेने आपल्या विद्यार्थ्यांसाठी ऐन सुटीत स्कूल शूज खरेदीचा अनोखा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शासनानेदेखील रोहिदास चर्मकार महामंडळाकडूनच शूज खरेदीचा हट्ट धरल्याने या हट्टापायी महापालिकेला 80 लाखांचा भुर्दंड बसणार आहे.
उद्योग सहसंचालकांचे उद्योग

गणवेश आणि स्कूल शूज विशिष्ट संस्थेकडूनच खरेदी करण्याबाबत शासनाकडून रेट कॉन्ट्रॅक्ट (शासन दरसूची) प्राप्त होत असते. मात्र, या दरसूचीतील दर हे बाजारभावापेक्षा जास्त असल्याने अनेकदा यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये वाद होत असतो. ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांनी खुल्या निविदेद्वारे गणवेश खरेदीची प्रक्रिया राबविल्याने शासनाच्या उद्योग सहसंचालकांनी संबंधित अधिकार्‍याची थेट कार्यालयीन चौकशी (डी.ई.) करण्याच्या धमकीचेच परिपत्रक पाठविले. यामुळे नाशिक महापालिकेतही खुली निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश महापौरांनी देऊनही प्रशासनाने मात्र वादग्रस्त ठाणेस्थित कलावती महिला मंडळालाच गणवेश खरेदीचे आदेश दिले.


आयुक्तच घेणार निर्णय
गणवेश खरेदीप्रमाणेच स्कूल शूज खरेदीबाबतही शासनाकडून खुल्या निविदेची प्रक्रिया न राबविता विशिष्ट संस्थेकडूनच खरेदीचे निर्देश प्राप्त झाले आहेत. मात्र, नगरसेवक तसेच महापालिका शिक्षण मंडळ सदस्यांकडून त्यास विरोध होऊ लागला आहे. खरेदी शिक्षण मंडळामार्फतच करावी, असा आग्रह धरला जात असल्याने वाद निर्माण होऊ नये म्हणून याबाबत आयुक्तच निर्णय घेतील. हरिभाऊ फडोळ, उपायुक्त