आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • For Compasignation Bell Vehicles Worker's Death Body Bring In Nashik Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भरपाईसाठी घंटागाडी कामगाराचे पार्थिव थेट नाशिक महापालिकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - खतप्रकल्पावर काम करताना हृदयविकाराने मृत्यू झालेल्या घंटागाडी कामगाराचे पार्थिव महापालिकेत आणून श्रमिक संघाने ठेकेदाराकडे आर्थिक भरपाईबरोबरच वारसाला नोकरी देण्याची मागणी केली. मात्र, श्रमिक संघ व ठेकेदारातील बोलणी फिसकटल्याने अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत वाद तात्पुरता मिटवला.

सुभाष दगडू घुगरे (वय 40, देवळाली गाव) घंटागाडी योजनेचे ठेकेदार चेतन बोरा यांच्याकडे पश्चिम विभागात कामाला होते. काम करताना दुपारी चक्कर येऊन ते खाली पडले. सहका-यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर श्रमिक घंटागाडी कर्मचारी संघाने पार्थिव देह थेट महापालिकेच्या आवारात आणला. अचानक आंदोलन सुरू झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिस दाखल झाले.

यावेळी संघाचे अध्यक्ष महादेव खुडे यांनी कामगारांची नियमित आरोग्य तपासणी केली जात नाही, कमी मोबदल्यात जादा काम, रजा न देणे अशा तक्रारी केल्या. मृताच्या वारसाला नोकरी व कुटुंबियांना तत्काळ आर्थिक भरपाईची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत पार्थिव हलवणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली. त्यामुळे पेच निर्माण झाला. ठेकेदार व संघटनेच्या पदाधिका-यांत चर्चा होऊनही तोडगा निघत नसल्याने चार तास आंदोलन सुरू राहिले. पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत गुरुवारी सकाळी मृताचे नातेवाईक, संघटना पदाधिकारी आणि ठेकेदार बोरा यांना सरकारवाडा पोलिस ठाण्यात बैठकीसाठी बोलविले आहे. त्यावर सहमती दर्शवत नातेवाइकांनी पार्थिव ताब्यात घेतले. आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे यांनी घंटागाडी कामगारांच्या आरोग्य तपासणीसंदर्भात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र बोलणी पुन्हा अयशस्वी झाल्यास घंटागाडी बंदचा इशारा महादेव खुळे यांनी दिला आहे.

122 नगरसेवक कुठे गेले?
‘निवडून येण्यापुरते कामगारांना हाताशी धरत गोडगोड बोलणारे 122 नगरसेवक आता कुठे गेले’, असा संतप्त सवाल कामगारांनी केला. ठेकेदाराकडे घंटागाडीविषयी तक्रार केल्यास ‘तुमचे तुम्ही बघून घ्या’, असे सांगत कामगारांवरच सर्व जबाबदारी टाकली जात असल्याची तक्रारही करण्यात आली.

जबाबदारी ठेकेदाराचीच
कामगार विमा योजनेअंतर्गत कामगारांचा विमा काढण्यात येतो. कागदपत्रांची पूर्तता करून आर्थिक मदत आणि कामगारांची नियमित आरोग्य तपासणी ही ठेकेदाराचीच जबाबदारी आहे.
डॉ. सचिन हिरे, आरोग्य अधिकारी