नाशिक - पुणे-नाशिकमार्गावरील शिवनेरी बस शनिवारी (दि. ७) पहाटे द्वारका परिसरात बंद पडली. परंतु, नाशिक विभागात शिवनेरीच्या दुरुस्तीसाठी एकही मेकॅनिक उपलब्ध नसल्याने त्यासाठी थेट पुण्याहून मेकॅनिक बोलवावा लागला. या प्रकारामुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन झाला.
शिवनेरी बसला चांगला प्रतिसाद मिळत असतानाही त्यांच्या देखभालीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. शनिवारी पहाटे पुण्याहून येणारी बस द्वारका परिसरात इंजिनमध्ये बिघाड झाल्याने बंद पडली. बस लॉक झाल्याने तेथून हलविणेही शक्य होत नव्हते. रस्त्यावरच बंद पडलेल्या या बसमुळे परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. अशा परिस्थितीत नाशिक विभागात शिवनेरी बस दुरुस्तीसाठी मेकॅनिकच नसल्याची बाब समाेर आली. त्यामुळे बसदुरुस्तीसाठी थेट पुण्याहून मेकॅनिक बोलाविण्यात आला. चार-पाच तासांचा प्रवास करून मेकॅनिक पुण्याहून १२.३० वाजेच्या सुमारास नाशिकला पोहाेचल्यावर दुरुस्तीचे काम करण्यात आले. या अजब प्रकाराची रस्त्यावरून जाणाऱ्या लाेकांमध्येही चर्चा हाेत हाेती.
शिवशाही बस पळवल्या, शिवनेरी तरी चांगल्या द्या...
नाशिक-पुणे मार्गावर मोठा गाजावाजा करून अत्याधुनिक सोयीसुविधा, संपूर्ण वातानुकूलित शिवशाही बस सुरू करण्यात आल्या. मात्र, वरिष्ठांच्या दबावामुळे त्या नागपूरला पळविण्यात आल्या. अाता स्थानिक प्रवाशांसाठी सोयीच्या असलेल्या शिवनेरी बस तरी चांगल्या द्याव्या, अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करीत आहेत.