आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Tenth Years Garbage Vehicle Will Take For Contract

दहा वर्षांसाठी घंटागाडी, प्रस्ताव कचरापेटीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दीर्घ मुदतीचे ठेके महापालिकेसाठी घातक असल्याचे सिद्ध झाल्यानंतरही दहा वर्षांसाठी अंदाजे तीनशे काेटी रुपयांचा घंटागाडीचा ठेका देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव साेमवारी महासभेत अखेर नगरसेवकांचा कडाडून विराेध लक्षात घेत कचरापेटीत पाठविण्यात आला. त्याएेवजी तीन वर्षांसाठी ठेका देताना एका ठेकेदाराला जास्तीतजास्त तीनच विभागांची कामे घेण्याची अट ठेवण्यात आली. दरम्यान, प्रभागनिहाय ठेक्यासाठी उपमहापाैरांपासून तर नगरसेवकापर्यंत असे सर्व जण आक्रमक असताना महापाैर अशाेक मुर्तडक यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत प्रशासनाच्या प्रस्तावाला हिरवा झेंडा दाखवला.

गेल्या काही दिवसांपासून तीनशे काेटींच्या ठेक्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत हाेता. या प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवक तुटून पडले. अरविंद शेळके यांनी प्रस्तावातील कठाेर अटींचा समाचार घेत यापूर्वी घंटागाडीला विलंब झाल्यास दंडात्मक कारवाईचे काय झाले, असा सवाल केला. नंदिनी जाधव यांनी दाेन लाख रुपयांच्या नगरसेवकांच्या फायली निघत असताना, दहा वर्षांसाठी तीनशे काेटी काेठून आणणार, असा सवाल केला. तानाजी जायभावे यांनी आंदाेलन करणा-या कर्मचा-यांवर गुन्हे दाखल केले. मात्र, पालिकेचा कंत्राटी कामाचा परवाना ज्यांच्यामुळे रद्द झाला त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली. सुधाकर बडगुजर यांनी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता सध्याच्या ठेकेदाराला भले मुदतवाढ द्या, मात्र पुन्हा प्रस्ताव तयार करून कमीत कमी कालावधीसाठी घंटागाडीचा ठेका देण्याची सूचना केली. शिवसेना गटनेते अजय बाेरस्ते यांनी पेलिकन पार्क, खत प्रकल्पाची उदाहरणे देत दीर्घ मुदतीच्या ठेक्यांमुळे पालिकेला झालेले नुकसान सर्वश्रृत असतानाही पुन्हा ताेच धाेका का पत्करला जाताे, असा सवाल केला. पालिकेने स्वत:च कर्मचारी भरती करून कचरा उचलण्याचे काम करावे, अशीही सूचना केली. भाजप गटनेते संभाजी माेरुस्कर यांनी शहरात पायलट प्राेजेक्ट म्हणून किमान एक वर्ष तरी प्रभागनिहाय घंटागाडीची याेजना राबवा, अशी मागणी केली. संजय चव्हाण यांनी शहरात घंटागाडीचा एकाच कंत्राटदाराला िदलेल्या ठेक्यामुळे झालेले गंभीर प्रकार माहीत असताना पुन्हा ताेच मार्ग िनवडू नये, असे सांगितले.

आयुक्तांवर हल्लाबाेल : शिवसेनानगरसेवक विलास शिंदे यांनी घंटागाडीचा प्रस्ताव आहे का, काेणाची सुपारी असा उल्लेख केल्यानंतर सभागृहातील वातावरण गंभीर बनले. आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनाही शब्द बाेचल्यानंतर त्यांनी हा प्रश्न काेणाला उद्देशून असा सवाल केला. प्रस्ताव प्रशासनाचा माझ्या सहीचे डाॅकेट असल्याचे सांगितल्यानंतर शिंदे यांनी कनिष्ठ अधिका-यांना उद्देशून हा सवाल केल्याचे सांगितले. दरम्यान, महापाैरांनी सुपारी हा शब्द वगळण्याचे आदेश दिले.

त्यानंतर काँग्रेस गटनेते उत्तम कांबळे यांनीही आयुक्तांवरच हल्लाबाेल केला. ते म्हणाले की, महापालिका स्वायत्त संस्था असून, येथील निर्णय लाेकप्रतिनिधींना घेण्याचे स्वातंत्र्य आहे.

आयुक्तांनी मांडले प्रस्तावाचे अंतरंग
एकाच ठेकेदाराकडे शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी दिली तर कारवाई नियंत्रण साेपे ठरणार असल्याचे आयुक्त डाॅ. गेडाम यांनी सांगितले. जवळपास ४५० टन कचरा प्रतिदिन संकलनासाठी घंटागाड्यांची संख्या वाढणे गरजेचे असून, ती खरेदीसाठी पालिकेची सध्या क्षमता नाही. दुसरीकडे तितक्याच खर्चात कचरा उचलला जाणार असेल तर पालिकेचा फायदा हाेणार आहे. प्रभागनिहाय ठेक्यामुळे अनेक ठेकेदार येतील कारवाईत अडचणी येतील. अत्याधुनिक जीपीएस यंत्रणेद्वारे नियंत्रण ठेवले जाणार असून, दहा वर्षे ठेका देण्यामागे काेणती सुपारी वा लाेक डाेळ्यासमाेर नसल्याचे स्पष्टीकरण दिले. चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी खर्च माेठा असून, त्यादृष्टीने जास्त मुदतीचा ठेका असेल तरच ठेकेदार पुढे येतील असेही सांगितले.

घरपट्टी, पाणीपट्टी वाढ फेटाळली
महासभेमध्ये महापाैरांनी घरपट्टी पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव फेटाळून लावला. पालिका प्रशासनाला खडे बाेल सुनावताना कर वसुलीतील गळती थांबवून उत्पन्न वाढविण्याच्या कानपिचक्याही त्यांनी दिल्या. यापूर्वी स्थायी समितीने प्रस्ताव फेटाळून महासभेवर पाठवला हाेता. घरपट्टी पाणीपट्टीवाढीला माेठा िवराेध हाेता.