आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदाकाठी अस्वच्छता करणाऱ्या भिकाऱ्यांना हुसकावले, महापालिकेची धडक माेहीम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गोदावरी स्वच्छतेसाठी डोळ्यात तेल घालून सक्रिय झालेल्या महापालिकेला आता घाण करणाऱ्यांमध्ये भिकाऱ्यांचा मोठा हातभार असल्याचे लक्षात अाले अाहे. या भिकाऱ्यांना सुरक्षारक्षक हुसकावतात, परंतु सकाळी हुसकावलेले हे भिकारी सायंकाळी पुन्हा गाेदाकाठावर परतत असल्याने महापालिका प्रशासनाची धावपळ उडत अाहे. 
 
गोदेच्या कुशीत जीवन व्यतित करणाऱ्या या भिकाऱ्यांवर कारवाईसाठी पालिका अाता धडक मोहीम उभारणार असून त्यासाठी केंद्र शासनाच्या लाइव्हहुड मशिन याेजनेतून बेघर निवारा केंद्र उभारून तेथे भिकाऱ्यांना स्थलांतरित केले जाणार अाहे. केवळ गाेदाघाटच नव्हे तर संपूर्ण शहरातील बेघरांना येथे स्थलांतरित केले जाणार अाहे. 
 
उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर गोदावरी स्वच्छतेचा विषय एेरणीवर आला आहे. महापालिका अगदी खडबडून जागी झाली असून, गोदावरी स्वच्छतेसाठी कृती आराखडा तयार केला आहे. 
 
त्याचाच एक भाग म्हणून गोदावरी संवर्धन कक्षही स्थापन झाला आहे. या कक्षामार्फत गोदावरी स्वच्छ कशी होईल या एकमात्र बाबीवर फोकस केला जात आहे. दरम्यान, गोदावरी स्वच्छतेसाठी यापूर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांची नेमणुक होणार होती, मात्र स्वतंत्र पोलिसांची तुकडी देण्यापासून तर त्यांच्या वेतनाबाबतचा प्रश्न आल्यावर हा विषय मागे पडला. त्यातून आता सोमेश्वर ते नांदूरपर्यंत महापालिका हद्दीत गोदावरी पात्रात कपडे वाहने धुणे, कचरा टाकणे,भाजीपाला फेकणे तत्सम प्रकारची अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यासाठी भरारी पथकापासून तर वसुलीसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली जात आहे. अहिल्याबाई होळकर पुलापासून ते तपोवनापर्यंत तीन सत्रांत ९० सुरक्षारक्षक गोदापात्रावर नजर ठेवून आहेत.
 
या सुरक्षारक्षकांनी घाण करणाऱ्या काही नागरिकांना दंडही केला. मात्र, खरी समस्या येथील भिकाऱ्यांची जाणवत आहे. गोदापात्रालगत मोठ्या प्रमाणात भिकारी, बेघर तसेच मजूर राहात आहेत. या गोदामाईच्या कुशीत दोन हजारापेक्षा अधिक लोक राहात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांची अार्थिक स्थिती नाजूक असून सकाळी प्रातर्विधीपासून तर अन्य सर्व बाबींसाठी गोदापात्राचाच आसरा त्यांना घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून स्नानापासून तर स्वयंपाक, कपडे धुणे अन्य कामांसाठी गोदापात्राचा वापर होत आहे. त्यांची अार्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे किंबहुना भीक मागून उदरनिर्वाह केला जात असल्यामुळे त्यांच्याकडून एकदा घाण केल्यास एक हजार दुसऱ्यांदा पकडले तर हजार दंड आकारणी कशी करायची हा पेच आहे. या पार्श्वभूमीवर भिकाऱ्यांना हुसकण्याची मोहीम सुरू झाली आहे. मात्र, सकाळी गायब झालेले भिकारी लगतच्या मंदिराजवळून चक्कर मारून सायंकाळी परतत असल्यामुळे प्रशासनाची धावपळ उडत आहे. या पार्श्वभूमीवर काहीही झाले तरी भिकाऱ्यांना पिटाळून लावण्याचे सक्त आदेश सुरक्षारक्षकांना देण्यात अाले असून, त्यांच्याकडून भाविक पर्यटकांना होणाऱ्या त्रासातूनही सुटका करून देण्याचा पालिकेचा उद्देश आहे. 
 
निवारागृह बंधनकारकच : सिंहस्थनगरीजेथे असेल तेथे भिक्षेकऱ्यांसाठी निवारागृह असणे बंधनकारकच अाहे. सिंहस्थकाळात भारतभरातील भिक्षेकरी नाशिकमध्ये येतात. मात्र, सिंहस्थानंतर अनेक येथेच स्थायिक हाेतात. अशा भिक्षेकऱ्यांसाठी निवारागृहाची व्यवस्था पालिकेकडून यापूर्वीच हाेणे गरजेचे हाेते. केवळ निवारागृह सुरू करण्यापेक्षा भिकाऱ्यांचे पुनर्वसन केंद्र सुरू करून संबंधितांना भीक मागण्यापासून कायमस्वरूपी परावृत्त केल्यास राज्यातील हा पथदर्शी प्रकल्प ठरू शकताे. 
 
तात्पुरती नव्हे; कायमस्वरूपी असावी उपाययाेजना 
भिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात हटविण्यापेक्षा त्यांचे पुनर्वसन करून ते पुन्हा गाेदावरी परिसरात येऊच नये म्हणून प्रयत्न हाेणे गरजेचे अाहे. यापूर्वी देखील भिकाऱ्यांना वेळाेवेळी हटविण्यात अाले अाहे. परंतु ही कार्यवाही केवळ माेहिमेपुरती मर्यादित राहून काही दिवसांनी ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशी परिस्थिती झाली अाहे. अातातरी या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययाेजना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत अाहे. 
 
बेघर निवारा केंद्र गुलदस्त्यात 
उघड्यावरराहणाऱ्या तसेच निराधार बेघरांसाठी शहरात स्वतंत्र निवारा केंद्र उभारण्याचे आदेश देत त्याची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात अाली हाेती. खास करून थंडीत भिकाऱ्यांचा काकडून मृत्यू झाल्यानंतर याबाबत आदेश दिले होते. त्यावेळी गंगाघाट परिसरात ‘बेघर निवारा केंद्र’ उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र, हे ठिकाण भिकाऱ्यांचे अधिकृत निवासस्थान होईल गर्दी जमेल म्हणून स्थानिक नगरसेवकांनी त्यास विरोध केला होता. दरम्यान, आता तपोवनातील जनार्दन स्वामी आश्रमाच्या मागील बाजूस बांधकाम विभागाने बेघर केंद्र उभारणीचे काम हाती घेतले असून, गंगाघाटावरील भिकाऱ्यांना या ठिकाणी हलवले जाणार आहे. 
 
सर्वच बेघरांचे स्थलांतरण 
- केंद्रशासनाच्या लाइव्हहुड मिशन याेजनेंतर्गत सर्वच बेघरांना हक्काचे छत म्हणून निवारा केंद्रात स्थलांतरित केले जाणार अाहे. गाेदाघाटावरील भिकारी येथे प्राधान्याने हलवले जातील.
-राेहिदास दाेरकुळकर, उपायुक्त, गाेदावरी संवर्धन कक्ष 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...