आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचारांसाठी ३०० रुग्णांची नोंदणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर- डॉ. राजूल वासा फाउंडेशनच्या वतीने रविवारपासून सातपूर कॉलनी येथे सुरू करण्यात आलेल्या केंद्रात नाशिकसह पुणे, मुंबई, औरंगाबाद, नगर, धुळे या भागातील ३०० हून अधिक रुग्णांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या रुग्णांवर १५ ऑगस्टपासून मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
मुंबई येथील डॉ. राजूल वासा फाउंडेशनच्या वतीने सातपूर कॉलनी येथील संत शिरोमणी नामदेव महाराज सभागृहात उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. रविवारी या केंद्राच्या उद्घाटनानिमित्त कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रमुख पाहुणे म्हणून वनाधिपती विनायकदादा पाटील, मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सभागृहनेते सलीम शेख, भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सीताराम पारिक, शंकर देवघरे आदी उपस्थित होते.
कार्यशाळेस रुग्णांसह त्यांचे नातलग प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने काही नागरिकांना जमिनीवर बसून, तर काहींना सभागृहाच्या बाहेर उभे राहून कार्यक्रमाची माहिती ऐकावी लागली. राठी उद्योगसमूहाच्या अर्पणा राठी यांनी प्रोजेक्टरच्या मदतीने स्क्रीनद्वारे पूर्वीचे रुग्ण आणि डॉ. राजूल वासा यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या उपचार पद्धतीची चित्रफीत उपस्थितांना दाखवून त्याबाबतची माहिती दिली. या चित्रफितीत त्यांच्या मुलाचाही समावेश होता.
बालरुग्णावर उपचार करताना डॉ. राजूल वासा सहकारी. दुसऱ्या छायाचित्रात शिबिरासाठी मुलाला घेऊन येणारी महिला. नोंदणीनंतर रुग्णांवर मोफत उपचार सुरू केले जाणार आहेत.
आयुक्तांनी केले कौतुक
फादर्स डे आंतरराष्ट्रीय दिनाच्या दिवशीच व्यथितांना दिलासा देण्याच्या कार्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सभागृहनेते सलीम शेख डॉ. राजूल वासा यांनी अतिशय हृदयस्पर्शी कार्य हाती घेतले आहे. विशेषत: मोफत असलेल्या या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी करून संगणकावर उपचार पद्धतीचे व्हिडिओ चित्रण बघितले. विशेष म्हणजे, आयुक्तांना दुसरीकडे जाण्याची घाई असतानाही त्यांनी या कार्यक्रमास बराच वेळ दिला.
पालिकेकडून जागा उपलब्ध करून देणार
डॉ.राजूल वासा फाउंडेशनच्या या कार्याचा लाभ राज्यातील शेकडो रुग्णांना होणार आहे. केवळ नाशिकच नव्हे, तर मालेगाव, नगर, जळगाव येथील रुग्णांकडूनही नोंदणी होत आहे. या समाजोपयोगी उपक्रमासाठी पालिकेच्या वतीने एक एकर जागा उपलब्ध करून देणार असल्याची घाेषणा सभागृहनेते सलीम शेख यांनी या वेळी केली.
बातम्या आणखी आहेत...