आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणरणत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काहींच्या पायात चपला.. तर काही अनवाणी काटे तुडवीत....कुठे उतारावरून भरलेल्या हंड्यासोबत तोल सांभाळत, तर कुठे जीव चढ चढीत.... कुठे पायवाटाने तर कुठे दुपारच्या रणरणत्या उन्हाने तापलेल्या डांबराचे चटके सहन करीत...महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट.... ‘दिव्य मराठी’ने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पाहणी केली असता एकीकडे विहिरी, तलाव कोरडेठाक पण महिलांच्या डोळ्यात तरळणारे पाणी दुष्काळाची दाहकता सांगून जात होते.... विविध गावांतील महिलांनी कथन केली पिण्याच्या पाण्याबाबतची करुण कहाणी ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी....

नाशिक जिल्ह्यात पंधरा तालुक्यांपैकी चार तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये पाण्याबाबत कायम समस्या असते. परंतु, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दोन ते तीन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते. गतवर्षी पावसाने दिलेल्या दडीमुळे धरण, तलाव आणि विहिरी या कोरड्याठाक पडल्या आहेत. यामध्ये मालेगाव, नांदगाव, येवला, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, सिन्नर आणि चांदवड तालुक्यात पाण्याची अधिक वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक विहिरींना पाणीच नाही. महिलांना तर पाण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. त्यासाठी डोक्यावर दोन हंडे, एका हातात तिसरा हंडा आणि दुसऱ्या हातात पाणी शेंदण्यासाठी लागणारी बादली. चांदवड तालुक्यात रायपूर, वाहेगाव, निमाेण, मालेगाव तालुक्यात निमगाव, निंबायती, येवला तालुक्यात भारम, कोळम, ममदापूर आणि राजापूर, सिन्नर तालुक्यात शहा, पांचाळे, देवपूर या गावांना भेटी दिल्या. या वेळी त्या ठिकाणच्या महिलांसोबत चर्चा केली असता त्या महिलांनी सांगितले की, पाणी हे सर्वांनाच लागणारे आहे. कपडे, चांगले खाणे, फिरायला जाणे हे दुष्काळामुळे टाळता येते, पण पिण्याचे पाणी गरजेचेच असल्याने त्यासाठी पाणी शोधत फिरावे लागते. रोज सकाळ आणि सायंकाळी पाण्याची गरज लागते. पाण्याची बचत करण्यासाठी कधी कधी लहान पोरांना बिगर अांघोळीचे ठेवावे लागते, तर स्वयंपाक आणि जेवणासाठी कमी भांड्याचा वापर करून तर कपडे धुवावे लागू नये, म्हणून कपडे बदलण्यावर आवर घातला आहे. येवला तालुक्यात भारम, कोळम, राजापूर, ममदापूर या परिसरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने महिलांना विहीर आणि हातपंपाशिवाय पर्याय नाही. मात्र, पाण्याची पातळी अधिक खोल गेल्याने हातपंपांनाही पाणी येत नाही, तर गावातील केवळ तीन ते चार विहिरींच्या तळाशी पाणी दिसून आले.

पाणी शेंदून आरोग्यावर परिणाम
विहिरीतीलपाणीपातळी अधिक खोल गेल्याने महिलांना अधिक वेळ पाणी शेंदावे लागते. त्यामुळे पाण्याची भरलेली बादली वरती ओढून ओढून खांदे आणि पोटाचा त्रास होत असल्याचेही महिलांनी सांगितले. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना आरोग्याकडे दुर्लक्ष करून कुटुंबासाठी पाणी शेंदण्याचे काम करावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणीही होत आहे.
बातम्या आणखी आहेत...