आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका करणार आता नेहरू वनोद्यानाचा विकास, त्रिपक्षीय करार करण्‍यासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिले आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पांडवलेणी जवळील नेहरू वनोद्यान वनविभागाने महापालिकेस विकसित करू द्यावे, असे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिले. उद्यानाचे विकसन आणि देखभालीसाठीचा त्रिपक्षीय करार करण्याबाबतचा प्रस्ताव येत्या दहा दिवसांच्या आत सादर करण्याचेही वनमंत्र्यांनी आदेशित केले.
मुंबई येथील अतिथीगृहात मुनगंटीवार यांच्यासमवेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंसह नाशिक महापालिकेतील पदाधिकारी वनविभागाच्या अधिका-यांची बैठक झाली. या बैठकीत उपरोक्‍त महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पाथर्डी शिवारात सध्या सुरू असलेल्या नेहरू वनाेद्यानाकडे दुर्लक्ष होत आहे. फाळके स्मारक, बुद्ध स्मारक, पांडवलेणी या पर्यटन स्थळांबरोबरच वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या नेहरू उद्यानाचा विकास करण्याची संकल्पना काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मांडली होती. या उद्यानात अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. त्यांना इजा पोहोचवता उद्यान विकसित करण्याच्या हेतूने सोमवारी मुंबईत बैठक झाली. यावेळी महापोर अशोक मुर्तडक, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, अामदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार अपूर्व हिरे, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती राहुल ढिकले, वनविभागाचे सचिव तिवारी आदी उपस्थित होते.
अर्थसंकल्पात संरक्षक भिंतीसाठी तरतूद
नेहरूवनोद्याना जवळ अतिक्रमणे वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्यानाला संरक्षक भिंत बांधून द्यावी, असा प्रस्ताव वनविभागाच्या काही अधिका-यांनी वनमंत्र्यांसमोर मांडला. त्यास तातडीने मंजुरी देत आगामी अर्थसंकल्पात या संरक्षक भिंतीसाठीच्या निधीची तरतूद केली जाईल, असे वनमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.