आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्याप्रमाणे आम्हीदेखील सेवेकरीच...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - धार्मिक क्षेत्रात साधू-संत ज्याप्रमाणे सेवाकार्य करतात, त्याचप्रमाणे राजकारणात राहून आम्हीही जनतेची सेवाच करीत असतो. सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकच्या दृष्टीने सर्वात मोठा उत्सव असल्याने त्यासाठी राजकारणातील मतभेद दूर ठेवून आम्ही सर्व एकत्र येऊन साधू-संत, भाविक पर्यटकांची सेवा करू. कुंभमेळ्यानंतरही पर्यटनाच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी येथे केले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी साधुग्राममध्ये आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांची रविवारी भेट घेतली. या वेळी साधुग्राममधील सोयी-सुविधांविषयी चर्चा झाली. नाशिक ही पवित्र भूमी असून, येथे कुंभमेळा होत असल्याने प्रशासनाकडून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची कबुलीच ग्यानदास महाराजांनी दिली. तसेच, १९ ऑगस्टला होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी भुजबळांना आमंत्रितही केले. कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करावे, अशी मागणी या वेळी ग्यानदास महाराजांनी केली. त्यावर भुजबळ म्हणाले की, कुंभमेळ्यासाठी मागील दोन ते तीन वर्षांपासून तयारी सुरू होती. तसेच, राज्य केंद्राकडून जास्त निधी मिळावा, यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेतही बैठक घेतली. त्यामुळे चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्याने साधू-संतांची गैरसोय होणार नाही, असेही ते म्हणाले. या वेळी आमदार जयवंत जाधव हेदेखील उपस्थित होते.

पर्यटनाचा ओघ वाढेल
नाशिकमधील तीर्थस्थळांचा विकास करण्यात आला असून, उड्डाणपूल आणि रिंगरोडमुळे शहराचा विकासही झाला आहे. कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी भाविक पर्यटक नाशिकमध्ये येतील. नाशिकमधील विकासकामे पाहिल्यानंतर, तसेच तीर्थस्थळांचे महत्त्व समजल्यानंतर कुंभमेळ्यानंतरही पर्यटकांचा हा ओघ सातत्याने वाढत जाईल. त्यामुळे नाशिकच्या विकासात आणखी भर पडेल, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला.

सीधी बात नहीं दिखाते
धर्मकार्यातसाधू-संत सेवा करतात, त्याचप्रमाणे राजकारणात अाम्हीही सेवा करत असतो. तसेच, माध्यमेही सेवा करतात. परंतु, चांगल्या बातम्यांना अधिक टीआरपी मिळत नसल्याने ही माध्यमेसुद्धा कधी कधी नकारात्मक बातम्या दाखवतात. त्यावरून काही काळ चर्चाही होते. मात्र, सत्य बाहेर येतेच, असे सांगत भुजबळांनी अप्रत्यक्षपणे आपली भूमिकाच मांडली.
महंत ग्यानदास महाराजांसमवेत चर्चा करताना माजी पालकमंत्री छगन भुजबळ.