आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांच्या भुजबळ भेटीमुळे मनसेत असंतोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिंहस्थकुंभमेळ्याचा निधी मिळवण्याकरिता सत्तेत नसतानाही माजीमंत्री छगन भुजबळ यांना महापौर पदाधिका-यांनी साकडे घातल्याने मनसेत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, नगरसेवकांमधील खदखद व्यक्त करत मनसेचे गटनेते अशोक सातभाई यांनी महापौरांवर शरसंधान केले. भुजबळ सत्तेत असताना निधी आणू शकले नाही, मग आता ते निधी कसे आणणार, असा सवाल करीत घरचा आहेरही त्यांनी दिला.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेचा 1052 काेटी रुपयांचा आराखडा मंजूर असून, यातील दोन तृतीयांश निधी देण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपवण्यात आली. पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शासनानेच निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मनसे करीत आहे. यापूर्वी मनसेचे तत्कालीन महापौर अॅड. यतिन वाघ यांनी तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांना तसे पत्रही दिले होते. मात्र, सत्तेत असताना त्याबाबत निर्णय झाला नाही. गुरुवारी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भुजबळ यांची भेट घेत पुन्हा सिंहस्थ निधीसाठी नेतृत्व करण्याची मागणी केली. दरम्यान, या भेटीची मनसे गटनेते वा अन्य नगरसेवकांना माहितीच नसल्याचे सातभाई यांनी सांगितले. मुळात भुजबळ हे सत्तेत नसताना ते निधी कसे मिळवतील, असा सवालही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. निधीसाठी भाजपच्या आमदारांनाही सोबत घेणे गरजेचे होते त्यांच्या माध्यमातून प्रश्न लवकर निकाली निघू शकला असता असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. महापौरांच्या भेटीवरून मनसेतील असंतोष उघड झाला असून, आता पक्षांतर्गत नाराजी शमवण्यासाठी महापौर काय करतात, हे बघणे महत्त्वाचे ठरेल.