आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्र्याच्या मुलासह सात जणांवर गुन्हा, बनावट सही करून संस्थेवर कब्जा मिळविल्याचे प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जनतादलाचे माजी मंत्री दिवंंगत निहाल अहमद यांची बनावट सही प्रतिज्ञापत्राद्वारे शैक्षणिक संस्थेवर कब्जा मिळवल्याने त्यांचा मुलगा संशयित इश्तियाक निहाल अहमदसह आणखी सहा जणांविरोधात नाशकात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्धापकाळाने निहाल अहमद यांचे २९ फेब्रुवारी २०१६ रोजी नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. याच दिवशी त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा इश्तियाक यांनी वडील हयात असल्याचे दर्शवून नाशिकच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात सहा साथीदारांसमवेत संगनमत केले वडिलांची बनावट स्वाक्षरी प्रतिज्ञापत्र तयार करत अंजुमन तालिम-ए-जमहूर या शैक्षणिक संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या फेरफाराचे प्रकरण सादर केले. मालेगावचे एक वकील त्यांचा पुत्र तसेच नाशिकच्या एका वकिलाने निहाल अहमद यांनी त्यांच्या समक्ष सही प्रतिज्ञापत्र दिल्याचेही प्रमाणपत्र दिले. माजी आमदार निहाल अहमद यांच्या निधनानंतर काही दिवसांनी या सात जणांमधील बेलबाग परिसरात राहणारे डॉ. इफ्तेखार अहेमद यांनी मी शैक्षणिक संस्थेचा सचिव झाल्याचे घोषित केले. याची कुणकुण लागल्याने निहाल अहमद यांच्या दुसऱ्या पत्नीचे पुत्र बुलंद एकबाल यांनी याप्रकरणी धर्मादाय आयुक्त कार्यालयात चौकशी करून कागदपत्रांच्या नक्कल प्रति काढल्या. त्यावर वडील निहाल अहमद यांची कुणीतरी बनावट स्वाक्षरी करून प्रतिज्ञापत्र दिल्याचे आढळले. 

संबंधित कागदपत्रे पुण्यातील हस्ताक्षरतज्ज्ञांकडे पाठविले असता सह्या बनावट असल्याचा त्यांनी अहवाल दिला. या प्रकरणी प्रथम मालेगावच्या आझादनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यासाठी बुलंद एकबाल यांनी फिर्याद दिली. परंतु, धर्मादाय आयुक्त कार्यालय हे नाशिकच्या मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी (दि. १३) निहाल अहमद अब्दुल खालिक (रा. चुन्नाभट्टी), मुख्तार अहमद मोहम्मद युसूफ (रा. खुशामदपुरा), इफ्तेखार अहेमद मोहम्मद हुसेन (रा. बेलबाग), इश्तियाक अहमद निहाल अहमद (रा. नवापुरा) यांच्यासह दाेन वकील अशा सात जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सतीश घोटेकर पुढील तपास करत आहेत. 
 
संस्थेची स्थापना १९६० मध्ये 
माजीमंत्री निहाल अहमद यांनी मालेगाव येथे १९६० मध्ये अंजुमन तालिम-ए-जमहूर या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेत पाच सदस्यांचे कार्यकारी मंडळ ६२ सभासद आहेत. निहाल अहमद या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. 

समन्स बजावणार 
- निहाल अहमदयांची बनावट स्वाक्षरी प्रतिज्ञापत्र धर्मादाय आयुक्त कार्यालयात सादर करून अंजुमन तालिम-ए- जमहूर या शैक्षणिक संस्थेवर कब्जा मिळविल्याने सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना समन्स पाठविले जाणार असून संपूर्ण चौकशी केली जाईल.
सतीश घोटेकर, सहायक निरीक्षक, मुंबईनाका पोलिस ठाणे 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...