नाशिक- मनसेच्या प्रदेश सरचिटणीसपदाच्या राजीनाम्यानंतर पक्षातच राहण्याचे संकेत देणारे नाराज वसंत गिते यांना मंगळवारी (दि. 4) शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पक्षप्रवेशाचे आमंत्रण दिले. मात्र, भाजपमधील एका गटाने त्यास विरोध दर्शवला आहे. तसेच दोन्ही पक्षांतून मोठी जबाबदारी वा पद देण्याबाबत शब्द नसल्याने गिते समर्थक गोंधळात पडल्याचे समजते. याबाबत खुद्द गिते यांनी चुप्पी साधल्याने संभ्रम अधिकच
वाढला आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर गितेंनी अचानक 31 ऑक्टोबरला पक्षातील पदांचा राजीनामा दिला. त्यांच्यासह जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरेंसह दोनशेहून अधिक पदाधिका-यांनी राजीनामे धाडले. मात्र, गितेंनी पक्षातच राहीन, असे नमूद केले आहे. दुसरीकडे गिते बाहेर पडतील, अशी अटकळ बांधून सेना-भाजप नेत्यांनी त्याचा फायदा उचलण्याचे प्रयत्न केले. सेनेकडून अॅड. शिवाजी सहाणे, चंद्रकांत लवटे, विनायक पांडे, विलास शिंदे यांनी गितेंच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. गितेंपुढे सेनेकडून प्रवेशाचा प्रस्ताव ठेवल्याचे समजते. मात्र, गितेंनी दोन दिवसांत समर्थकांशी बोलून निर्णय घेऊ, असे सांगत दोघांनाही शब्द देणे टाळले.
वाट खडतर : सेनेत स्थानिक पदाधिकाऱ्यांशी जुळवून घेण्यात गितेंना अडचणी येतील, तर दुसरीकडे अनेक वर्षांपासून भाजपात असलेल्यांची दावेदारी बघता गितेंना जबाबदारी मिळण्याची वाट खडतर असल्याचे चित्र आहे.
मुंबई नाक्यावर सकाळी गर्दी; सायंकाळी शांतता
गिते यांच्यासह जवळपास दोनशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी सकाळी मुंबईनाका येथील त्यांच्या निवासस्थानी समर्थकांची गर्दी जमली होती. त्र्यंबक नगरपालिकेतील नगरसेवक व मनसे पदाधिकाऱ्यांनी गिते यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर राहण्याचा शब्द दिल्याचे समजते. त्र्यंबकच्या नगरसेवकांच्या राजीनाम्याबाबत मात्र निर्णय स्पष्ट झाला नाही. दरम्यान, सायंकाळी राज ठाकरे यांनी सर्वांचे राजीनामे मंजूर केल्यावर मात्र मुंबईनाका येथे शांतता होती. खुद्द गिते हेही बाहेर असल्यामुळे कार्यकर्त्यांची गर्दी जमली नाही.
शिवसेनेबाबतचा चेंडू अनिल देसाई यांच्या कोर्टात...
मनसेचे प्रदेश सरचिटणीस असलेल्या वसंत गिते यांच्याशी बोलणी करण्यासाठी शिवसेनेने दुसऱ्या फळीतील नेत्यांना पाठवल्याची बाब राजकीय वर्तुळात मंगळवारी दिवसभर चर्चेचा विषय ठरली. जिल्हाध्यक्ष, महानगरप्रमुखही प्रक्रियेपासून दूर होते. दुसरी बाब म्हणजे, गिते यांचे बालपणाचे मित्र असलेले माजी महापौर विनायक पांडे यांना पाठवून गिते यांचे मन वळवण्याचा प्रयत्न झाला. प्रामुख्याने गिते यांनी आरंभीस ते मनसेतच राहणार असल्याचे सांगितले होते. गिते हे पक्ष बदलण्याप्रत आले आहे, हे दाखवून देण्याची खेळीही शिवसेनेकडून झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गिते यांची शिवसेना उपनेते अनिल देसाई यांच्याशी फोनवरून बोलणीही करून देण्यात आली. देसाई यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे कळवले.
मनसेसोबतच राहणार
राज ठाकरे यांनी आठ वर्षे काम करण्याची संधी दिल्याबाबत आभार मानतो. राजीनामे स्वीकारण्याचे अधिकारही त्यांच्याकडेच आहेत. यापुढे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. मनसेसोबतच राहणार आहे. सचिन ठाकरे, जिल्हाध्यक्ष, मनसे