आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आततायी सेना नेत्यांची पक्षप्रमुखांकडून खरडपट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मनसेप्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा देणा-या वसंत गिते यांना भेटून पक्षप्रवेशाबाबत चर्चा करणारे शिवसेना नगरसेवक पदाधिका-यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खरडपट्टी काढल्याचे वृत्त असून, त्यामुळेच गिते यांची भेट वैयक्तिक कारणास्तव घेतल्याचा दावा एका नगरसेवकाने केला.
शिवसेना प्रवेशाचे कोणतेही निमंत्रण गिते यांना दिले नसल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले असले तरी, गिते यांना शिवसेनेत घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा एक माेठा गट एकत्र आल्याच्या चर्चेत तथ्य असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.
मनसेतील पदाचा राजीनामा दिल्यानंतर गिते यांनी पक्षातच राहण्याचे संकेत दिले होते. मात्र, त्यांचे निकटवर्तीय असलेले शिवसेना नगरसेवक गिते यांना पक्षात घेण्यासाठी धडपड करीत होते. मंगळवारी अॅड. शिवाजी सहाणे, विलास शिंदे, विनायक पांडे, मामा ठाकरे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी गिते यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. एका नगरसेवकाने शिवसेना नेते अनिल देसाई यांच्याशी संपर्क करून दिल्याचीही चर्चा होती. यामुळे पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी संतप्त झाले. संपर्कप्रमुख, जिल्हाध्यक्ष, महानगरप्रमुख अशा संघटनेतील व्यवस्थेला सोडून थेट वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. याबाबत थेट ठाकरे यांच्याकडेही तक्रार गेल्यानंतर त्यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळेच पक्षतर्फे नव्हे, तर वैयक्तिक संबंधातून भेट घेतल्याचे स्पष्टीकरण देण्यास नगरसेवकांना सांगण्यात आल्याचे कळते.
दुसरीकडे, भेट घेणाऱ्या नगरसेवकांना पक्षाचा एक माजी आमदार एका पदाधिकाऱ्याने चाचपणीसाठी सहमती दिल्याचे समजते. त्यातूनच त्यांनी गिते यांची भेट घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यासंदर्भातील भ्रमणध्वनीवरील फोन रेकॉर्डही उपलब्ध असून, पक्षांतर्गत राजकारणात अडचणीत आणल्यास त्याचा वरिष्ठांकडे खुलासा केला जाईल, असेही खासगीत सांगण्यात आले.
नाराज नगरसेवकही संभ्रमात
भाजपशिवसेना या दोन्ही पक्षांतून मनसेच्या राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून नाराज नगरसेवकही संभ्रमात पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे पक्ष साेडणार असल्याचे सांगणारे अनेक नगरसेवक बुधवारी महानगरप्रमुख तथा स्थायी समिती सभापती अॅड. राहुल ढिकले यांच्याकडे आपण पक्षासोबतच असल्याचा निर्वाळा देत होते. दुसरीकडे, गिते यांनीही आपल्यामुळे कोणीही पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊ नये, असेही नगरसेवकांना सांगितल्याचे समजते.
गडकरीही म्‍हणतात, ‘तूर्त थांबा’
गितेयांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक आमदारांनी राज्यातील नेत्यांच्या संपर्कात राहून विरोध केल्यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय सुरेशबाबा पाटील यांच्या माध्यमातून गडकरींकडे पक्षप्रवेशाच्या हालचाली झाल्याचे वृत्त आहे. मात्र, त्यास उघडपणे कोणीही दुजोरा दिलेला नाही. गडकरी यांनीही तूर्तास थांबण्याचा सल्ला दिल्याचे समजते.