आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिरायला गेलेल्या चार बहिणी बंधा-यात बुडून अंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदूरशिंगोटे - चास (ता. सिन्नर) येथील साठवण बंधा-यात बुडून सोमवारी एकाच कुटुंबातील चार मुलींचा हृदयद्रावक अंत झाला. वनिता सुदाम खैरनार (16), मंगल जालिंदर जाधव (14), रोहिणी गीताराम शिरसाट (15 रुई, ता. राहाता) व कविता शरद रक्ताटे (20, कोकमठाण ता. कोपरगाव) अशी मृतांची नावे आहेत. या चौघीही आते- मामे बहिणी आहेत.


या चौघीही आपले मामा सुदाम विठोबा खैरनार यांच्या घरी आल्या होत्या. सोमवारी दुपारी खैरनार यांची मुलगी वनिता हिच्यासोबत सर्वजणी घराबाहेर पडल्या. काही अंतरावर असलेल्या बंधा-यातील पाण्यात त्या उतरल्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघी पाण्यात पडल्या, तर त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात अन्य दोघीही आत ओढल्या गेल्या. त्यांच्यासोबत असलेली दीपाली सुनील खैरनार (15) ही काठावरच होती. तिने मदतीसाठी टाहो फोडला. मात्र, जवळ कोणीही नसल्याने मदत मिळाली नाही. अखेर दीपालीने मोबाइलवरून हा प्रकार घरी कळवला. मात्र, कुटुंबीय येईपर्यंत चौघीही बुडाल्या होत्या.


वनिताची आते बहिण मंगल शिकण्यासाठी त्यांच्याच घरी होती. रोहिणी व कविता या सख्ख्या बहिणी असून गेल्याच महिन्यात कविताचा विवाह झाला होता. मामाच्या घरी सर्वजणी एकत्र आल्या असतांना त्यांच्यावर काळाने घाला घातला. पोलिस उपअधीक्षक संदीप आटोळे यांच्यासह पोलिस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. सायंकाळी सिन्नर नगरपालिका दवाखान्यात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी वावी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहा. निरीक्षक देवेंद्र पाटील पुढील तपास करत आहेत.