आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडा; क्रिस्टल असोसिएट्स कंपनीचा प्रताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अभियंता, एमबीएसारख्या पदवीधारकांना रायगड येथील एका स्टील कंपनीत भरघोस पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत शहरातील सुमारे 200हून अधिक बेरोजगारांना गंडा घालत क्रिस्टल असोसिएट्स कंपनीने गाशा गुंडाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित कंपनीविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

पोलिसातील तक्रारीनुसार राजीव गांधी भवनसमोरील सुयोजित इमारतीत क्रिस्टल असोसिएट्सचे कार्यालय सुरू होते. या कार्यालयात दोन महिला कर्मचारी व सुनील नासारे नामक अधिकारी बसत होता. क्रिस्टल असोसिएट्सच्या नावाने वर्तमानपत्रात ‘जे. एस. डब्लू स्टील कंपनी, रायगड मधील नोकरीसाठी कार्यालयात संपर्क साधण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावरून अतुल म्हस्के, भगवान परदेशी, सचिन गुजराथी यांच्यासह तब्बल 50 हून अधिक अभियंता, एमबीए झालेल्यांनी संपर्क साधला. त्यातील काही उमेदवारांकडून कंपनीने सुरुवातीला एक हजार, तर उर्वरित उमेदवारांकडून पाच ते आठ हजारांपर्यंत नोंदणी शुल्क घेत त्यांना पावती दिली. त्यातील काहींना पुणे येथे मुलाखतीसाठी पाठवून त्यांना ऑफर लेटर दाखविण्यात आले.

उमेदवारांना दरमहा 15 ते 25 हजारांपर्यंत पगार आणि विविध सोयी-सुविधांचे आमिष दाखविण्यात आले होते. मात्र, उमेदवारांनी जेव्हा अधिकारी भासविणार्‍या व्यक्तींशी वारंवार संपर्क साधला तेव्हा, नाशिकसह पुण्यातील कार्यालयात ही मंडळी उपलब्ध होत नसल्याचे व त्यांचे मोबाइलही बंद असल्याचे आढळून आले.

नोकरीसाठी पैसे भरलेल्या व अर्ज केलेल्या उमेदवारांनी क्रिस्टल असोसिएट्सचा सुनील नासारे याची चौकशी केली असता पुण्यातील कार्यालय हे केवळ 20 दिवसांसाठी भाडेतत्त्वावर घेतल्याचे आणि त्यांचे मोबाइल क्रमांकही दुसर्‍यांच्या नावे घेतल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, या प्रकरणात संशायितांना अटक करून बेरोजगारांचे पैसे मिळावेत, इतर ठिकाणच्या युवकांची होणारी फसवणूक थांबवावी, अशी मागणी या उमेदवारांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

तक्रार अर्जानुसार चौकशी
क्रिस्टल असोसिएट्सविरुद्ध 20 ते 22 जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांद्वारे चौकशी करून त्यात तक्रारदारांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्यास गुन्हे दाखल केले जातील. उमेदवारांनीही कंपनीची शहानिशा, सत्यता तपासूनच अर्ज भरावेत. कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये.
-सुरेश सपकाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सरकारवाडा