आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एमएलटी’च्या तीन हजार विद्यार्थ्यांच्या निकालात घोळ; मुक्त विद्यापीठात उत्तरपत्रिकाच सापडेनात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गेल्या वर्षी मुक्त विद्यापीठातर्फे परीक्षा दिलेल्या ८५ हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाच सापडत नव्हत्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सरासरी गुण देऊन उत्तीर्ण केल्याचे उघडकीस आल्यानंतर यंदाही असाच प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. मुक्त विद्यापीठातील बी.एस्सी एमएलटी या विद्याशाखेत शिक्षण घेणाऱ्या तब्बल ३ हजार विद्यार्थ्यांच्या निकालात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून विद्यापिठाकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शहरातील दोन महाविद्यालयातील ८०  विद्यार्थ्यांमधील केवळ दोनच विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले असून, अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका मागितल्यानंतर त्या उपलब्धच नसल्याचे धक्कादायक उत्तर मुक्त विद्यापीठाकडून देण्यात अाले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत गेल्या वर्षी परीक्षा दिलेल्या तब्बल ८५ हजार विद्यार्थ्यांच्याच उत्तरपत्रिका गहाळ केल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस अाणले हाेते. गेल्या वर्षी मुक्त विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी तब्बल ७ लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परंतु, त्यातील ८५ हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाच गहाळ झाल्या होत्या. या उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंगसंदर्भात कुठलीही माहिती परीक्षा विभागाकडे नाही. त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा प्रकार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून करण्यात आला होता. 

यंदा नुकतीच परीक्षा झाल्यानंतर विद्यापीठाच्या विविध कोर्सेसचे निकाल एक महिन्यातच जाहीर करण्यात आले. निकाल तपासणीच्या याद्या देण्याअगोदरच जाहीर करण्यात आल्याची तक्रार शिक्षकांकडून करण्यात आली आहे. आता बी.एस्सी. एमएलटी या विद्याशाखेत शिक्षण घेणारे  तब्बल ३ हजार विद्यार्थ्यांच्या निकालात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. बी.एस्सी. एमएलटीच्या एचएससी १२५, १२६, १२८, १२० व एचएससी १२३ या उत्तरपत्रिकांची तपासणीच झाली नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. शहरातील दोन महाविद्यालयांतील ८० विद्यार्थ्यांमधून केवळ दोनच विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे.

सर्व विद्यार्थी ५० ते ५२ टक्क्यांपर्यंत उत्तीर्ण
मुक्त विद्यापीठातील बी.एस्सी. एमएलटी या विद्याशाखेत शिक्षण घेणारे जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्या विद्यार्थ्यांना ५० ते ५२ टक्क्यांदरम्यान गुण मिळाले आहे. या शाखेतील जो विद्यार्थी टाॅपर आहे. एका विद्यार्थ्यास अनेक विषयांत ७५ ते ८० गुणांच्या वर गुण मिळालेले आहे. मात्र, एका विषयात फक्त १७ गुण मिळाल्याने तो अनुत्तीर्ण झाला. त्यामुळे त्याने विद्यापीठाकडे तक्रार केली अाहे.

उत्तरपत्रिका तपासल्याच नाही
मी ज्या पेपरमध्ये अतिशय कमी प्रश्न सोडविले त्या पेपरमध्ये मला चांगले गुण मिळाले आहेत. ज्या पेपरचा अभ्यास केला, पूर्ण पेपर सोडविला त्याच पेपरमध्ये मात्र विद्यापीठाकडून नापास   करण्यात  आले. आमच्या उत्तरपत्रिका तपासल्याच नसाव्यात अशी आता खात्री झाली अाहे.
- सोनाली करंदीकर