आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्‍ये 3000 लोक 20 कोटींना फसले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- फक्त 40 हजार रुपयांत कारचे मालक व्हा, असे जर तुम्हाला कोणी पोटतिडकीने पटवून देत असेल तर तुम्ही पैसे का नाही गुंतवणार? पण, खरोखरच 40 हजार रुपयांत कार मिळते का? कशी मिळणार? काय कागदपत्रे लागणार? याची चौकशी जर तुम्ही केली नाहीत तर फसलाच म्हणून समजा. पुण्यात तब्बल 3000 ठेवीदार अशाच एका घटनेत फसून त्यांना 20 कोटी रुपयांचा चुना ‘युनिक फिनकॉर्प’ने लावला. अशा घटनेत पैसे परत मिळण्याची खात्री नसतेच. मात्र, आर्थिक गुन्हे शोध पथक (ईओडब्ल्यू)चे तत्कालीन प्रमुख व महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीचे विद्यमान सहसंचालक सुनील फुलारी यांनी कौशल्य पणास लावून संशयितांच्या मुसक्याच आवळल्या नाहीत, तर सुमारे 11 कोटींची रोकड ठेवीदारांना मिळवून दिली.

‘युनिक फिनकॉर्प’च्या कार्यालयातील संगणकाच्या हार्डडिस्क, कागदपत्रे ताब्यात घेऊन चौकशी सुरू झाली. कांबळेसह संचालकांचे बॅँक खाते गोठवण्यात आले. विमानतळ, रेल्वे अधिकार्‍यांकडे फोटो व माहिती पोहोचविली गेली. साक्षीदारांचे जबाब नोंदविताना कांबळे याचा मामा रक्कमा स्वीकारायचा, हाच धागा पकडत आधी क्रांतीकुमार निवृत्ती वाघमारे (रा. पिंपरी) या मामाला अटक करताना घराच्या झडतीत 58 लाखांची रोकड सापडली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने एका नातलगाचे नाव व पत्ता दिला. कुठलाही विलंब न करता पुण्याहून हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे एक पथक रवाना झाले. तेव्हा संजय बारवाडे याच्या शेतात गवतात दहा खोक्यांमध्ये चार कोटी 34 लाख रुपये सापडले.

वाघमारेच्या कबनूर गावातील अन्य तिघा नातलगांची महिनाभरातील प्रगती संशयास्पद असल्याचे समजताच शोध घेतल्यानंतर एका खोलीत दिवा ठेवलेली फरशी उचकताच त्यात पाच खोक्यांमध्ये दोन कोटी 50 लाख रुपये सापडले. यापाठोपाठ हातकणंगले तालुक्यातीलच तिळवणी येथील कांबळे याच्या घरीही छापा टाकला असता आणखी तीन खोक्यांत दीड कोटींची रोकड मिळाली. याच कालावधीत कोल्हापूरहून मोटारीतून 48 लाखांची रोकड घेऊन जाताना दोघांना ताब्यात घेतले. दिल्लीत लपून बसलेल्या संशयित कांबळे यास ती रक्कम वाशी येथून पाठविण्यात येणार असल्याचे समजले. तोपर्यंत फुलारी यांनी दोघा संचालकांसह कांबळेचे वडील, मामा, मित्र अशा 11 जणांना अटक केली. न्यायालयाने कांबळेचा अटकपूर्व जामीन फेटाळला. अखेर कांबळे पोलिसांना शरण आला. या गुन्ह्यात 11 कोटींची रक्कम आणि दहा गाड्या व फ्लॅट, प्लॉट, शेती अशी 17 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात पोलिसांना यश आले. न्यायालय परवानगीनुसार मालमत्ता जप्तीची प्रक्रिया पूर्ण करीत ठेवीदारांचे पैसे परत करण्याची मागणी फुलारी यांनी केली.

गृहमंत्रालयाकडून दखल
फुलारी यांनी रिझर्व्ह बॅँक, विमा आयोग, सेबी आणि केंद्र शासनाच्या नोंदणी, परवाना तज्ज्ञांना पाचारण करून पथकातील अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले. यामुळे विभागाची कामगिरी गुन्हे शोध पथकापेक्षाही अधिक प्रकर्षाने उजळून निघाली. फुलारी यांच्या कामगिरीची दखल गृहमंत्रालयाने घेत संपूर्ण पथकाला रोख बक्षिसे देत प्रशस्तिपत्रके देऊन गौरविले.

तीस टक्के रक्कम भरा
कंपनीचे मुख्य संचालक प्रेमचंद अशोक कांबळे (रा. ठाणे), अनिल भारंबे, संतोष शिंदे (रा. पुणे) हे तिघे कार खरेदी करणार्‍यांच्या स्वागताला असतात. ते सांगतात, इंडिका, ओम्नी, तवेरा अशा कारचे मालक होण्यासाठी या कारच्या किमतीच्या दहा ते तीस टक्के रक्कम जमा करा. या रकमेवर कंपनी एका खासगी फायनान्समार्फत उर्वरित रक्कम उभारून कार खरेदी करेल. ती कार कॉलसेंटरला आमच्या मार्फतच लावून त्याबदल्यात प्रत्येक महिन्याला गाडीच्या प्रकारानुसार ठरविक रक्कम चेकने खात्यावर जमा केली जाईल. दोन वर्षांनतर कार स्वत:च्या नावावर करून दिली जाईल. स्टॅम्प पेपरवर करारही झाले. काहींच्या खात्यावर वर्षभर प्रत्येक महिन्याला पैसेही जमा झाले. यामुळे या कंपनीचा प्रचार आणि प्रसार होत जाऊन गुंतवणूक वाढली.

‘दहा दिवस वाट बघा’
जून 2007 मध्ये म्हणजे ज्यांनी पैसे गुंतविले त्यांच्यासाठी दीड वर्षांनंतर खात्यावर पैसेच जमा होत नसल्याने त्यांनी कंपनीकडे विचारणा केली. ‘दहा दिवस वाट बघा, पैसे जमा होतील’, असे कंपनीकडून सांगण्यात आले. मात्र, महिना उलटूनही पैसे जमा न झाल्याने अनेकांनी कार्यालयाकडे धाव घेतली. त्याठिकाणी 50 ते 60 गुंतवणूकदार आधीच वाद घालत होते. काहींची समजूत काढून त्यांना परत पाठविण्यात आले.

शिवीगाळ अन् हाणामारी..
ठेवीदारांची गर्दी वाढतच होती. आता ठेवीदारांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने शिवीगाळ, हाणामारीसारखे प्रकार घडत होते. तीन दिवस शासकीय सुटी, त्यानंतर चार दिवस संगणकीकरण नावाने कार्यालय बंद राहणार असल्याची सूचना लावली. हीच संधी ओळखून मुख्य संचालक कांबळे यांनी सर्व ठेवी जमा करून गाशा गुंडाळला. उर्वरित संचालक, कर्मचार्‍यांचे सर्व मोबाइल क्रमांक बंद. ही वार्ता समजताच असंख्य ठेवीदारांनी कार्यालयाबाहेर गर्दी केली. कार्यालयाबाहेर एकच गोंधळ उडाला.

महिनाभरानंतर गुन्हा
महिनाभरानंतर सचिन गायकवाड (रा. धनकवडी, पुणे) यांनी कागदपत्रांसह पोलिसांत तक्रार दिली. प्रथमदर्शनी 80-90 लाखांपर्यंत वाटणार्‍या फसवणुकीची व्याप्ती वाढून तीन हजार ठेवीदारांना 20 कोटी रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले. हा तपास आर्थिक गुन्हा शोध पथकाकडे सोपविण्यात आला. या ठकांना हातकड्या घालायच्याच, असा निश्चय आर्थिक गुन्हे शोध पथक (ईओडब्लू)चे प्रमुख सुनील फुलारी यांनी केला.