आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्वर्ण जयंती’ योजनेच्या नोकरीसाठी अभियंत्याला २५ हजारांचा गंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केंद्रशासनाच्या स्वर्ण जयंती स्वरोजगार योजनेचा देशपातळीवर गाजावाजा सुरू असताना, या योजनेच्याच नावाखाली नाशकातील सुशिक्षित बेरोजगारांना बड्या पगाराचे आमिष दाखवून गंडा घातला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शहरातील युवा अभियंत्याला बनावट नियुक्तीपत्र देऊन २५ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. संबंधित नियुक्तीपत्रासाठी शासकीय राजमुद्रा वॉटरमार्क असलेल्या कागदाचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा फसवणुकीच्या घटना वाढूनही पोलिस यंत्रणा ढिम्म असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
केंद्र राज्य सरकारच्या विविध योजनांच्या नावाने लोगोचा वापर करून आर्थिक फसवणुकीचे अनेक प्रकार उघडकीस आलेले असतानाच हा आणखी एक प्रकार समोर आला आहे. नाशकातील प्रफुल्ल पुंडलिक पवार या अभियंत्याने जूनला केंद्र सरकारच्या स्वर्ण जयंती स्वरोजगार योजनेच्या swarnjayantirozgaryojana.com या संकेतस्थळावरील एका जाहिरातीनुसार ऑनलाइन अर्ज भरला. सात दिवसांनंतर या संकेतस्थळावरच परीक्षा देण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, परीक्षाही ऑनलाइन झाली. परीक्षेचा निकाल लागलीच जाहीर करून आठवडाभरात नियुक्तीपत्र प्राप्त होईल, असे सांगण्यात आले नियोजित वेळेतच नियुक्तीपत्र प्राप्त झाले. या पत्रात ‘ग्राहक सेवा प्रतिनिधी’ पदाची माहिती देण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष कामावर रुजू होण्यापूर्वी लॅपटॉप आणि मोबाइलसाठी १३ हजार ८५० रुपये स्टेट बँकेच्या ३४९२०८१३०३२ या क्रमांकाच्या खात्यात भरण्याचे सांगण्यात आले. नियुक्तीपत्रावर भारत सरकार, राजमुद्रा, नोंदणी क्रमांक, सही-शिक्के, संकेतस्थळ, महात्मा गांधींचे छायाचित्र असल्याने त्यावर विश्वास ठेवून प्रफुल्ल पवार याने संबंधित खात्यात १३ हजार ८५० रुपये भरले. त्यानंतर नियुक्तीपत्रावरील ०८५८६९१३३९४ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्यावर कागदपत्रांसाठी आणखी १२ हजार ५०० रुपये भरावे लागतील त्यानंतर लॅपटॉप, मोबाइल कामाचे स्वरूप सांगण्यास प्रतिनिधी घरी येईल, असे त्यास सांगण्यात आले. परंतु, पैसे भरून दोन आठवडे उलटूनही कोणी घरी न आल्याने संबंधित क्रमांकावर संपर्क साधला असता तो बंद आढळला. त्यापाठोपाठ संकेतस्थळ बंद पडल्याचे दिसले. या कागदपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका कार्यालयात संपर्क साधला असता कागदपत्रेच बनावट असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, तक्रार नोंदविण्यास पाेलिसांकडूनही टाळाटाळ झाल्याचे सांगण्यात आले.

प्रकरणाची चौकशी करणार
स्वर्णजयंती स्वयंरोजगार योजना पालिकेत सुरू आहे. मात्र, त्यात पैसे भरण्याची गरज नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पोलिसांनाही गुन्हे दाखल करण्याबाबत कळविण्यात येईल.
जितेंद्र काकुस्ते, निवासी उपजिल्हाधिकारी

गृह विभागाकडे तक्रार करणार
केंद्र शासनाच्या नावाने तरुणांच्या फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. बेरोजगारांनी नोकरीसाठी कुठेही पैसे भरू नयेत. या योजनेच्या नावाखाली सुरू असलेली फसवणूक थांबविण्यासाठी केंद्र राज्याच्या गृह विभागाकडे तक्रार करण्यात येईल.
सीमा हिरे, आमदार
संकेतस्थळावर पंतप्रधानांचे छायाचित्र
नियुक्तीपत्रात दरमहा ३० हजार ५०० रुपये पगार निश्चित करण्यात आला असून, बेरोजगारांना योजनेची माहिती प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या संकेतस्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. त्यामुळे साहजिकच विश्वास बसत असून, माझ्यासारख्या किमान ५० ते ६० सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक होऊन कोट्यवधींना गंडा घातला गेला आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई करणे अपेक्षित आहे.
बातम्या आणखी आहेत...