आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक करणार्‍या दुकानदाराला 32 लाखांचा दंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ग्राहकांची फसवणूक करणार्‍या दुकानदारांवर वैधमापनशास्त्र विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. दोषी दुकानदारांकडून दंडापोटी 32 लाखांची वसुली करण्यात आली. वैधमापनशास्त्र काद्याअंतर्गत सर्वच दुकानदारांनी वजन, मापे, उपकरणे, मेकॅनिकल वजन मापे, काउंटर मशीन तराजू, इलेक्ट्रॉनिक वेइंग मशीन, वजन करण्याची उपकरणे, पट्रोलपंपावरील मीटर, धर्मकाटे, प्लॉट, फार्म काटे आदी व्यावसायिकांना दोन वर्षातून एकदा फेरपडताळणी व मूल्यांकन करून घेणे बंधनकारक आहे. फेरपडताळणी व मूल्यांकन केलेले प्रमाणपत्र दुकानात ठळक ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. काही दुकानदारांना हा नियम माहीतच नाही. गतवर्षी 23, तर चालू वर्षात फक्त 103 विक्रेत्यांनी हे प्रमाणपत्र घेतले आहे.

हे आहे बंधनकारक
वस्तूचे नाव, निव्वळ वजन, साइजमध्ये असेल तर संख्या, साइज, उत्पादनाचा महिना व वर्ष, सर्व करासहित किरकोळ अधिकतम किंमत, उत्पादक व पॅकरचा संपूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहिणे बंधनकारक आहे. कंझ्युमर केअर नंबर टाकणेही बंधनकारक आहे. खाद्य पदार्थ पॅकिंग करून विक्रेत्यांना देखील त्या पॅकिंगवर नियमांतर्गत सर्व बाबीचे लेबल लावणे बंधनकारक आहे. एकवेळ छापलेली किंमत, खाडाखोड करणे, किंमतीचे दुसरे लेबल लावणे, बिलाप्रमाणे कमी माल देणे, शेतकर्‍यांकडून जादा माल घेऊन कमी बिल देणे आदी प्रकार या कायद्यांतर्गत गुन्हा ठरतो. तर प्रत्येक पॅकिंगवर एकच लेबल बंधनकारक आहे. अतिरिक्त लेबल लावणे हा गुन्हा आहे.

कोठे होते फसवणूक
मिठाईच्या दुकानातून मिठाई विकत घेतेवेळी दुकानदार बॉक्ससह वजन करतो. त्यावेळी सुमारे 50 ते 100 ग्रॅमचा माल कमी मिळतो. बांधकाम व्यवसायामध्ये लागणारे स्टीलचे वजन करताना यात सुमारे 50 ते 100 किलोचा फरक जाणवतो. साखर कारखान्यात सभासदांसाठी वेगळा कोटा असतो, तर शेतकर्‍यांसाठी वेगळा असतो. उसाच्या वजनात किमान टनाचा फरक पडतो. पेट्रोल पंपावर पेट्रोल कमी दिले जाते. तेलाचा डबा विकत घेताना त्याचे वजन कमी असते. पॅकिंग केलेल्या वस्तूंचे वजन करून घ्यावे. यात काही ग्रॅमचा फरक जाणवतो.

जागरुक राहून खरेदी करावी
वजन-मापांचा संबध येणार्‍या ठिकाणी खरेदी करतेवेळी जागरूक राहून खरेदी करावी. दुकानदार नियम मोडत असेल्यास विभागास कळवावे. दुकानदारांवर कारवाई करण्यास मदत होईल. एस. एस. शिंदे, सहायक नियंत्रक, वैधमापनशास्त्र विभाग
न्यायालयीन दंडामध्ये वाढ
> 2011 - 12 मध्ये 10 दावे दाखल करण्यात आले. यामध्ये 19 हजार 300 इतका दंड आकारण्यात आला.
> 2012 -13 मध्ये 30 दावे दाखल करण्यात आले. यामध्ये 57 हजार रुपये दंडापोटी वसूल झाले.
अशी आहे कर्मचारी संख्या
10 वैधमापन निरीक्षक, 10 क्षेत्र सहायक, 10 शिपाई
अशी झाली वसुली
> 2012 - 13 मध्ये 1 कोटी 63 लाख 77 हजार रुपये वजन व मापे फेरपडताळणी व मुद्रांक शुल्क वसूल करण्यात आले.
> 2011 - 12 मध्ये 1 कोटी 58 लाख 3 हजार रुपये इतकेच शुल्क वसूल करण्यात आले होते.
अशी झाली कारवाई
> 2011 - 12 मध्ये 1225 विक्रेत्यांवर कारवाई झाली.
> 2012 -13 मध्ये 1781 विक्रेत्यांवर कारवाई झाली.
दंडात ही वाढ
> 2011 -12 अभिसंधान फी (दंड) 1071 केसेसमध्ये 32 लाख 52 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.