आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यविधीप्रसंगी दिली जातेय मोफत बससेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आपल्या कुटुंबातील सदस्याचे निधन होणे हा कोणाच्याही जीवनातील सर्वात दु:खद प्रसंग. अशा दु:खद प्रसंगात अंत्यविधीसाठी परगावाहून येणाऱ्या नातेवाइकांना अमरधामला जाणे-येणे हे मोठे जिकिरीचे काम असते. त्यामुळे अशा कुटुंबातील सदस्यांना नातेवाइकांना एका फोनवर मोफत बस उपलब्ध करून त्यांच्या अडचणीच्या प्रसंगी मोलाची मदत करण्याचे कार्य गत पाच वर्षांपासून सिडको येथील राजमल चोरडिया करीत आहेत.

घरातील व्यक्तीचे निधन झाल्यावर त्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळतो. या दु:खद प्रसंगी त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी ठिकठिकाणाहून नातेवाईक, मित्रपरिवार आधार देण्यासाठी येत असतात. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेकदा स्मशानभूमी लांब अंतरावर असल्याने अंत्यविधीला जाण्यासाठी नातेवाइकांना, मित्रपरिवाराला वाहने उपलब्ध नसल्याने अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. या गोष्टींची दखल घेत अशा दु:खद प्रसंगात अंत्यविधीला जाणाऱ्या नातेवाइकांना मोफत बससेवा पुरविण्याचे कार्य सिडकोतील मातोश्री ट्रॅव्हलचे संचालक राजमल चोरडिया करीत आहेत. शहरातील कोणत्याही भागातून अशा प्रसंगातील बससेवेची मागणी केल्यास तातडीने चोरडिया बस उपलब्ध करून देतात. गेल्या पाच वर्षांपासून चोरडिया हे कार्य करत असून, त्यांनी आतापर्यंत तीन हजारहून अधिक कुटुंबांना ही सेवा पुरविली आहे.

कधी दिवसातून दोन, तर कधी चार वेळादेखील कॉल येत असल्याने त्यानुसार बस उपलब्ध करून दिली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. दु:खद प्रसंगातही मदतीचे आधार ठरणारे चोरडिया यांनी भविष्यातही अशाच प्रकारे कार्य करत राहण्याचा मानस व्यक्त केला आहे. अशा प्रकारचा प्रसंग कोणावर ओढावल्यास बससेवेसाठी ०२५३-२३७७७३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

त्या दिवसापासून मनात आला विचार
माझ्या मित्राच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी अमरधाममध्ये गेलो होतो. अंत्यविधीनंतर घरी जाण्यासाठी वाहन उपलब्ध झाल्याने शेवटी रिक्षाने जावे लागले होते. त्या दिवसापासून अशा प्रसंगी मोफत बससेवा पुरविण्याच्या कार्याला सुरुवात केली. - राजमल चोरडिया