आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत घरे मिळण्याची अफवा; म्हसरूळ परिसरात एकच गर्दी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तपोवन परिसरातील कुंभमेळा झोपडपट्टी महापालिकेने हटविल्यानंतर बेघर झालेल्यांना महापालिका आपल्या मालकीच्या २५ एकर जागेत मोफत घरे देणार असल्याची अफवा पसरल्याने गुरुवारी (दि. २०) म्हसरूळ परिसरातील आरोग्य विज्ञान विद्यापीठा लगतच्या म्हसोबावाडीतील जागेवर एकच गर्दी झाली. या ठिकाणी आलेल्यांना हटविण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगविले.

कुंभमेळा झोपडपट्टी मंगळवारी (दि. १७) हटविल्यानंतर बेघर झालेल्या सुमारे ७० कुटुंबीयांनी म्हसोबावाडीतील पालिकेच्या मोकळ्या भूखंडावर डेरा टाकला होता. पालिका या जागेवर मोफत घरे देणार, अशी जोरदार अफवा पसरल्याने या ठिकाणी फुलेनगर, राहुलवाडी, वज्रेश्वरी झोपडपट्टी, अंबिकानगर झोपडपट्टी आदी भागांतील नागरिकांनी तेथे जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. झोपडी उभारण्यासाठी साहित्य घेऊन या ठिकाणी सुमारे दीडशे कुटुंबांनी गर्दी केली होती.
दरम्यान, याबाबत पालिकेला माहिती मिळताच अतिक्रमण निर्मूलन पथकाने सकाळी १० वाजताच या ठिकाणी धाव घेऊन पोलिस बंदोबस्तात तत्काळ अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केली. यामुळे संतप्त नागरिकांनी दगडफेक सुरू केली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. यावेळी काही महिलांनी डोके फोडून घेतले. पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगविले.
यानंतर नागरिकांनी पंचवटी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. पोलिस ठाण्यात जी. जी. चव्हाण, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी रोहिदास बहिरम, वरिष्ठ निरीक्षक शांताराम अवसरे आदींची बैठक सुरू होती. यावेळी चव्हाण यांनी ‘तूर्त म्हसोबावाडीत राहा, असे अधिकाऱ्यांनी सांगितले’ अशी माहिती दिल्यानंतर जमाव निघून गेला. परंतु, अधिकाऱ्यांनी असे आश्वासन दिले नसल्याचे सांगत अतिक्रमण केल्यास कडक कारवाई करण्याचे संकेत दिले. तर, निवासाचा प्रश्न सुटला नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा चव्हाण यांनी दिला.
म्हसरूळ परिसरातील या भूखंडावरून अतिक्रमण करणाऱ्यांना हटविले गेले.

अतिक्रमण केल्यास कारवाई
^म्हसोबावाडीत अतिक्रमण केल्यास पुन्हा कारवाई करण्यात येणार आहे. हटविलेल्या झोपडपट्टी धारकांना जागा देण्याचे आश्वासन दिलेले नाही. काही नेते त्यांना भडकवण्याचे काम करीत आहेत. रोहिदासबहिरम, उपआयुक्त,अतिक्रमण निर्मूलन विभाग