आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे मालवाहतुकीच्या दरवाढीमुळे शौचालयातून भाजीपाला वाहतूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - फुकट्या प्रवाशांप्रमाणे व्यावसायिकांकडून रेल्वेच्या फसवणुकीचा प्रकार गुरुवारी उघड झाला. रेल्वेची वाढीव दरवाढ परवडत नसल्याने व्यापा-यांनी प्रवासी बोगीच्या शौचालयातून मालवाहतूक केल्याने रेल्वेला हजारो रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.

रेल्वे आर्थिक नुकसानीत असल्याने रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी गेल्या आठवड्यात प्रवासी भाड्यात 14.2, तर मालवाहतुकीत 6.5 टक्के दरवाढीचा निर्णय घेऊन अंमलबजावणी केली. दरवाढीमुळे रेल्वेचे आर्थिक नुकसान कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेल्वे बोगीतून चोरटी वाहतूक सुरू झाल्याने ताकही गेले आणि तूपही गेले, असे म्हणण्याची वेळ आली आहे. नाशिकमधून मनमाड, भुसावळ, मुंबई आदी ठिकाणी भाजीपाला, कांदा व इतर मालवाहतुकीसाठी यापूर्वी बुकिंग केली जात होती. मात्र, दरवाढीमुळे अनुभवी व्यावसायिकांनी सरळ मार्ग सोडून अनधिकृत मार्गाची निवड केली. लांब पल्ल्याच्या गाडीच्या प्रवासी बोगीच्या शौचालयात भाजीपाल्याच्या गोण्या ठेवून मालवाहतुकीस सुरुवात केली. काल सकाळी लांब पल्ल्याच्या दोन गाड्यांमधून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची चोरटी वाहतूक झाल्याने रेल्वेला हजारो रुपयांचे नुकसान सोसावे लागले.

रेल्वेमधून दररोज शेकडो प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याने रेल्वेला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यात रेल्वेसमोर चोरट्या मालवाहतुकीची समस्या उभी ठाकली आहे.उपाययोजनेअभावी रेल्वेच्या नुकसानीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

कठोर कारवाई
विनातिकीट होणारा मालवाहतुकीचा प्रकार लक्षात आल्याने अशा व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वच गाड्यांच्या शौचालयांची तपासणी केली जाणार असल्याचे रेल्वे विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

मोठा अनर्थ शक्य
प्रशासनाने चोरट्या वाहतुकीवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे. समाजकंटकांकडून रेल्वेतून मालवाहतुकीच्या नावाखाली अनुचित प्रकार केल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.