आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फ्रेंडशिप डे’ची धूम.. मैत्रीचा अवघा रंग एकचि झाला...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रात्री 12 वाजेचा टोल पडला आणि अवघ्या तरुणाईचे मोबाइल खणखणले.. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, हाइक, चॅट-ऑन; अगदी काही नाही तर मेल अकाउंटवरसुद्धा मैत्रीच्या कवितांनी इनबॉक्स फुल्ल झाला. रात्री अगदी उशिरापासून सगळ्यांचे फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन सुरू झाले. टेक्नोसॅव्ही तरुणाईचा हा रंग रविवारी दिवसभर शहरात पाहायला मिळाला.

रात्री उशिरा व्हॉट्सअ‍ॅपपासून सुरू झालेल्या मैत्रीपर्वाचा रंग दिवसभर चढत होता. सकाळपासून तरुणाईने गंगापूररोड, कॉलेजरोड परिसरात गर्दी केली होती. सुसाट बाइक्स अन् तितकीच पक्की मैत्री या दिवसाची शोभा ठरली. पावसानेही दिवसभर जोर कमी ठेवून तरुणाईला डे एन्जॉय करू दिला. फ्रेंडशिप बँड्स आणि गिफ्टची दुकाने गर्दीने ओसंडून वाहत होती. पूर्वी रविवारी येणारा फ्रेंडशिप डे सोमवारी साजरा व्हायचा, रविवारी तसा या सेलिब्रेशनचा जोर कमी दिसायचा. पण, काळानुसार होणा-या बदलांनी स्थिती बदलत आहे. मुलांवर विश्वास टाकून पालकांनीही काळाबरोबर चालण्याची मानसिकता ठेवली. अनेक ठिकाणी तरुणाई सहकुटुंब मजा करताना दिसली.

दरम्यान, काही ‘वात्रट’ कारट्यांना पोलिसांनीही चांगला धडा शिकवला. उपद्रव होत असल्याशिवाय पोलिसही कोणाच्याच सेलिब्रेशनला अडवत नव्हते. पूर्वी काही संघटनांचा अशा दिवसांवर आक्षेप असायचा. आता हेही चित्र बदलत आहे. एकूणच भारावलेल्या वातावरणात हा दिवस तरुणाईने ‘एन्जॉय’ केला.

पोलिसांचा हिसका : ‘सुयोजित रोड’वर काहींनी स्टंटबाजी सुरू केली. याची आजूबाजूच्या नागरिकांनी पोलिसांना खबर दिली. पोलिस आल्याबरोबर एकच धावाधाव सुरू झाली.

बँडऐवजी मार्करचा फंडा
कॉलेजात नुकत्याच प्रवेश केलेल्यांनी बँडची प्रथा चालवली खरी, मात्र पूर्वीप्रमाणे क्रेझ कमी झाल्याचे दिसले. त्याऐवजी तरुणांनी मार्कर आणि पांढरा टी-शर्ट वापरून एकमेकांच्या आठवणी साठवून ठेवण्याचा नवा फंडा वापरला.

पिकनिक स्पॉट, रेस्टॉरंट हाउसफुल्ल
पाऊस सुरू असल्याने फ्रेंडशिप डेनिमित्ताने अनेकांनी सोमेश्वर, गंगापूर धरण, बॅकवॉटर्स, त्र्यंबकरोड, पहिने परिसरात गर्दी केली होती. सगळ्याच रेस्टॉरंट्समध्ये रात्री उशिरापर्यंत प्रचंड झुंबड उडाली होती.