आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Friendship Day Special N.D.Mahanor And His Friend Chandrakant

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साहित्यिक सोबत्याने सुख-दु:खात दिली सावलीसारखी साथ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य, शेती, विधीमंडळ अशा अनेक क्षेत्रात जवळचे आणि अत्यंत जवळचे अनेक स्नेही भेटले, परंतु प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात भक्कमपणे मागे उभा राहिला तो माझा मित्र चंद्रकांत. शब्दाच्या सोबत रमणे, डोळ्यांनी पाहिलेले आणि प्रत्यक्ष अनुभवलेले जीवन शब्दबद्ध करणे या समान धाग्याने चंद्रकांत आणि माझी मैत्री जमली.

1961 चा काळ असेल, बीड येथे झालेल्या प्रादेशिक साहित्य संमेलनात आमची ओळख झाली. वयाच्या 22 व्या वर्षी आमचे साहित्याच्या बाबतीत जुळणार्‍या विचारांनी आम्हाला आजही जोडून ठेवले आहे. आम्हा दोघांचे साहित्य हे कार्यक्षेत्र असल्याने त्यानंतर आम्ही सातत्याने एकत्र आलो. महाराष्ट्रातील नारायण सुर्वे, सुरेश भट, आरती प्रभुसारख्या नामवंत 35 कवींचा कवितासंग्रह आम्ही प्रकाशित केला. ‘पुन्हा कविता’ हे पुस्तक आम्ही प्रकाशित केले, तेव्हा साहित्य क्षेत्रात आमचे विशेष कौतुक झाले. माझ्या कविता, लेखन याकडे त्याचे बारीक लक्ष असते. त्यानेही अनेक पुस्तके लिहिली, जगभरातील चांगले साहित्य, कविता इंग्रजी, मराठी, हिंदी या भाषांमध्ये भाषांतरित केल्या. ज्या भाषेतील जे चांगले आहे ते इतर भाषांमध्ये रसिकांपर्यंत गेले पाहिजे यासाठी तो आयुष्यभर झटत राहिला. ‘कविता यतन’ हे त्याचे पुस्तक विशेष गाजले. सरस्वती भुवन महाविद्यालयातून प्रिन्सिपाल म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्याचा उत्साह तसाच आहे. एवढय़ा वर्षाचा आमचा स्नेह आम्हाला शब्दांच्या दुनियेपलीकडे वैयक्तिक प्रपंचापर्यंत घेऊन गेला. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या संकटांमध्ये चंद्रकांत माझ्या मागे सावलीसारखा भक्कमपणे उभा राहिला. नातवंडे लहान असताना माझ्या सुनेचे निधन झाले, त्यावेळी त्यानेच सहकुटुंब माझ्या परिवाराला आधार दिला. पुण्यात मोठय़ा रुग्णालयामध्ये डॉक्टरांची फौज, औषधासाठीची धावपळ आणि जगभरात कोठे उपचार होऊ शकतील यासाठी त्याच्याकडून सुरू असलेला प्रयत्न मी पाणावलेल्या डोळ्यांनी पाहिला आहे. आयुष्यात जेव्हा रडण्याची वेळ आली तेव्हा तोच आधार होता.

मोठा आधार
आयुष्यात डोंगराएवढे वाटणार्‍या दु:खात तो मोठा आधार होता. आज अनेक वर्षे लोटली पण आमची मैत्री कायम आहे. आम्ही कधीतरी भेटलो की पूर्वीचे दिवस आठवतो, तेव्हा त्याचा तो उत्साह मी अजूनही अनुभवतो.

शब्दांकन : प्रदीप राजपूत