आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From Today One Time Water Supply To The Nashik City

नाशिक शहरात आजपासून एकवेळ पाणीपुरवठा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सोमवारपासून संपूर्ण शहरात एकवेळ आणि सध्याच्या वेळेपेक्षा किमान 15 मिनिटे कमी वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. याशिवाय, मंगळवारी पाणीपुरवठा बंदचा निर्णय मागे घेण्यात आला असून, या दिवशीही पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाणीपुरवठा विभागाच्या या नव्या उपाययोजनेमुळे महिन्याकाठी 52 दशलक्ष घनफूट पाणी बचत साधली जाणार आहे.

शहरातील काही परिसरात दुबार, तर काही भागात एकवेळ पाणीपुरवठा केला जात होता. त्यातच कमी दाबामुळे विस्कळित झालेल्या पाणीपुरवठय़ामुळे नागरिकांमध्ये ओरड सुरू होती. याचा सर्वंकष विचार करून शहराच्या पाणीपुरवठय़ामधील वेळापत्रकात बदल करण्याविषयी निर्णय घेण्यात आला आहे.

गंगापूर धरणातील महापालिकेच्या पाणी आरक्षणातून 15 जूनपर्यंत शहराला पाणीपुरवठा होऊ शकेल, अशी सध्या स्थिती असली तरी पाऊस लांबल्यास तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागू नये, यासाठी पाणी कपातीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मंगळवारी पुरवठा बंद ठेवल्याने त्यानंतरच्या दोन ते तीन दिवस सिडको, सातपूर आणि जुने नाशिकमधील बहुतांश भागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे केल्या होत्या. त्यात काही नगरसेवकांनी मंगळवारच्या पाणीपुरवठा बंदचा सातत्याने विरोध केला होता. यामुळे किमान तीन दिवस पुरवठा विस्कळित होत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. एकवेळ मात्र मुबलक पाणीपुरवठा केला जावा अशी नगरसेवकांनी मागणी होती. त्यानुसार विभागाने हा निर्णय घेतला आहे.

प्रभाग बैठकींत पडसाद
महापालिकेने 18 मार्चपासून मंगळवारी पाणीपुरवठा बंद करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेक भागात कमी दाबाने आणि विस्कळित पाणीपुरवठा होत आहे. याचे तीव्र पडसाद महापालिकेच्या प्रभागांतील बैठकींत पडल्याचे दिसून आले. 8 मार्च रोजी सातपूर प्रभागाच्या बैठकीत नगरसेवकांनी या प्रश्नी सभागृहातच ठिय्या दिला आणि सभागृहात मंगळवारी पाणीपुरवठा करण्यात यावा, असा ठराव केला. अशोकामार्ग परिसरातही याच प्रश्नावरून महिलांनी रस्त्यावर उतरून अधिकार्‍यांना घेराव घातला होता. रस्ता आणि सभागृहातही हा प्रश्न ऐरणीवर आल्याने पाणीपुरवठा विभागाला एकवेळ पाणी आणि मंगळवारचा पाणीपुरवठा बंदचा निर्णय मागे घेणे भाग पडले.

पाणीपुरवठय़ात असा बदल
शहरातील पूर्व, पश्चिम, नाशिकरोड आणि पंचवटी या विभागांत दोन वेळा पाणीपुरवठा केला जातो. तेथे एकवेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्याचबरोबर सिडको आणि सातपूर येथे एकवेळ पाणीपुरवठा केला जातो, तेथेही 15 ते 20 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा सुरळीत होण्यास किमान चार दिवस लागतील. गतवेळी एकवेळ पाणीपुरवठा करण्यात आला होता, त्यावेळी जसे वेळापत्रक होते तसेच सोमवारपासून लागू होईल, असे पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश पवार यांनी सांगितले.