आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fruits Rate News In Marathi, Fruits Rate Incise Issue At Nashik, Divya Marathi

महाशिवरात्रीच्या फराळाचे दर सहा महिन्यांपूर्वीइतकेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महागाईचा आगडोंब सगळीकडेच पाहायला मिळत असला तरी निवडणूकपूर्व स्वस्त झालेल्या गॅस सिलिंडरमुळे काहीअंशी दिलासा मिळाला होता. आता त्यात आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे गुरुवारी (दि. 27) येत असलेल्या महाशिवरात्रीचा उपवास महागाईविना पार पडणार आहे. उपवासाच्या पदार्थांकरिता सहा महिन्यांपूर्वी इतकेच पैसे ग्राहकांना मोजावे लागणार असल्याने गृहिणींनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून, किराणा बाजार स्थिर असल्याने ही स्थिती पहिल्यांदाच पाहायला मिळत असल्याचे स्थानिक घाऊक व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

महागाईने गृहिणींचे बजेट सातत्याने कोलमडत असून, त्याची घडी व्यवस्थित बसवायची म्हणजे तिला तारेवरची कसरतच करावी लागते. याला काही वर्षांपासून कुठलाच उपवास अपवाद राहीलेला नाही. सहा-सहा महिन्यांनी उपवासाच्या पदार्थांची दरवाढ ठरलेली, अशी स्थिती असताना ग्राहकांना यंदाच्या महाशिवरात्रीने मात्र दिलासा दिला आहे. आषाढी, कार्तिकी एकादशी आणि नवरात्रोत्सवात ज्याप्रकारे फराळाच्या पदार्थांची दरवाढ झाली, त्याचा विचार करता शिवरात्रीला खरेदी करावयाच्या उपवासाच्या पदार्थांत स्वस्ताई नसली तरी या वस्तूंचे दर गत सहा महिन्यांपासून स्थिर असून, बहुतांश किराणा वस्तूंचे दर सहा महिन्यांपूर्वीचेच आहेत.

सहा महिन्यांत बदल नाही
उपवासाच्या पदार्थांत काहीही महागलेले नाही उलट राजगिर्‍याचे दर कमी झालेले आहेत. बाजार स्थिर असल्यामुळे ही स्थिती असून, यंदाची महागाईविना ही पहिलीच शिवरात्र म्हणावी लागेल. प्रवीण संचेती, संचालक, ओम ट्रेडिंग कंपनी

गृहिणींकरिता चांगली गोष्ट
खाद्यवस्तूंची दररोज भाववाढ होत असताना महाशिवरात्रीसाठी उपवासाकरिताच्या सर्वच पदार्थांचे दर स्थिर असून, गृहिणींकरिता निश्चितच ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. थोडक्यात कडकडीत उपवास करण्याची गरज पडणार नाही, हे निश्चित. दीपाली कोठुरकर, गृहिणी