आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा अधिकारी कार्यालयासह खो-खोपटूंनी केली इंधन बचत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील खो-खो संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध शाळांच्या खो-खोपटूंनी शुक्रवारी इंधन बचतीसाठी ‘दिव्य मराठी’च्या ‘या बिंदूचा सिंधू होवो’, या अभियानात सहभाग नोंदविला.

इंधन बचतीसाठी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हे अभियान सुरू आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच त्यांचे सर्व सहकारी शुक्रवारी सायकलने कार्यालयात आले. विभागीय क्रीडा संकुलातील जिल्हा खो-खो स्पर्धेसाठी श्रीराम विद्यालय, रुंग्टा हायस्कूल व मॉडर्न हायस्कूलमधील खेळाडूंचे पालक त्यांची ने-आण करणार होते. मात्र, या खेळाडूंसह क्रीडाशिक्षकांनीही निमाणी बसस्थानकावर येऊन तेथून शहर बसने स्पर्धेचे ठिकाण गाठले. त्यामुळे खासगी वाहनांचा वापर टळून इंधन बचत झाली. जिल्हा खो-खो संघटनेचे पदाधिकारी मंदार देशमुख, उमेश आटवणे यांनीदेखील सायकल चालवून इंधन बचतीत योगदान दिले.

अभियानांतर्गत उद्या सर्वांसाठी सायकल रॅली
अभियानांतर्गत उद्या (दि. 22) गोल्फ क्लब मैदानावरील जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयासमोरून सकाळी 8.30 वाजता सायकल रॅली निघेल. जिल्हाधिकारी विलास पाटील, महापौर अँड. यतिन वाघ, पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड हे रॅलीला हिरवा झेंडा दाखवतील. रॅली गोल्फ क्लब मैदान, शरणपूररोड, कॅनडा कॉर्नरमार्गे कॉलेजरोड, भोंसला मिलिटरी कॉलेज प्रवेशद्वार, जेहान सर्कल, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नलमार्गे जाऊन हुतात्मा स्मारकाजवळ आल्यानंतर समारोप होईल. रॅलीत सहभागी संघटनांचे पदाधिकारी, सदस्य तर उपस्थित राहतीलच, शिवाय इच्छुकांनी सकाळी 8.30 वाजेपर्यंत प्रारंभस्थळी उपस्थित राहून सहभाग नोंदविण्याचे आवाहन ‘दिव्य मराठी’ने केले आहे.

‘दिव्य मराठी’च्या ‘या बिंदूचा सिंधू होवो’ अभियानाबद्दलच्या प्रतिक्रिया, सूचना 8082005060 या मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे पाठवू शकता.