आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाशपर्वाला झळाळी सुवर्णालंकार खरेदीची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिककरांनी रविवारी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोने, चांदी, हिरे, अलंकार आणि वाहनांची मनपसंत खरेदी केली. शहरातील सराफी पेढय़ांतून दागिन्यांसह लक्ष्मीचे शिक्के, वेढे, बिस्किटे यांना विशेष मागणी होती. मुहूर्तावरील खरेदी म्हणून दिवसभर ग्राहकांचा उत्साह जसा सराफी पेढय़ांत दिसून आला, तसाच तो दुचाकी आणि चारचाकी वाहन वितरकांच्या दालनांतही दिसून येत होता. यातून रविवारी दिवसभरात शहरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापार्‍यांनी व्यक्त केला.

सराफी पेढय़ांमध्ये सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 30,400 (22 कॅरेट), चोख सोन्याचा भाव 30,700 रुपयांच्या जवळपास, तर चांदीचा भाव प्रतिकिलोस 49,200 रुपये किलो असा होता. शहरातील टीव्हीएस, होंडा, बजाज, यामाहा, महिंद्रा यांसारख्या दुचाकी, तर मारुती सुझुकी, टोयोटा, शेवरोले या कंपन्यांच्या वितरकांची दालने ग्राहकांनी गजबजलेली होती.

दिवसभरात एक हजारवर मोटारसायकली, तर चारशेच्या आसपास कारची डिलिव्हरी वितरकांनी दिली. मुहूर्त साधता यावा, याकरिता अनेकांनी चार महिने आधी नोंदणी करणे पसंत केल्याने मुहूर्तावर त्यांना आपली आवडती गाडी घरी घेऊन जाता आली. प्रत्येक शोरूममध्ये वाहनांच्या डिलिव्हरीसह मुहूर्तावरील नोंदणीही झाली.

दुचाकी वाहन खरेदीत तरुणाईचा उत्साह
नाशिककरांनी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधून मोटारसायकलींची खरेदी केली. तरुणांत प्रचंड उत्साह दिसून येत होता. आजच्याच दिवशी जवळपास दोनशे गाड्यांची डिलिव्हरी दिली. शहरातील वितरकांचा हाच आकडा एक हजारच्या पुढे जाणारा आहे. विजय कुलकर्णी, व्यवस्थापक, मॅजिक टीव्हीएस

नवरात्रीपेक्षा उत्तम प्रतिसाद
तीनच दिवसांत 121 कारची डिलिव्हरी आम्ही दिली असून, नवरात्रीपेक्षा दिवाळीत उत्तम प्रतिसाद ग्राहकांनी दिला. शहरातील जवळपास सर्वच वितरकांकडे हीच स्थिती आहे. राजेश कमोद, महाव्यवस्थापक, सेवा ऑटोमोटिव्ह

दागिन्यांना राहिली मागणी
मंगळसूत्र, बांगडी यांसारख्या दागिन्यांना विशेष मागणी होती. खरेदी वाढण्यात आगामी लग्नसराईचाही परिणाम जाणवला. नीलेश बाफना, संचालक, बाफना ज्वेलर्स प्रा. लि.