आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्याकडे स्वेटरला प्लास्टिक लावून मिळेल, सोशल मीडियावर अवकाळी पावसाच्या मेसेजेसची दाटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात पावसाचे रिपरिप सुरू असताना साेशल मीडियात या अवेळी पावसाचा धुमाकूळ वाचायला मिळत हाेता. पाऊस अाणि थंडीमुळे घराबाहेर पडलेल्या नाशिककरांनी या अवेळी अालेल्या पावसाची साेशल ‘खिल्ली’ उडवली. अर्थात पावसाची व्हिकेट घेताना काही राजकीय काेट्यांनीही पाेटधरून हसायला भाग पाडले. ‘मौसम मस्ताना गरज नसताना’पासून सुरू झालेला हा सिलसिला शेवटी “स्वेटर आणि रेनकोट दोन्ही घालण्याची संधी, होय मी लाभार्थी’ म्हणत सरकारपर्यंत येऊन पोहोचला. इतकेच नाही तर ‘आमच्याकडे स्वेटरला प्लास्टिक लावून मिळेल’ अशी खुशखुशीत पुणेरी पाटीही गारव्याप्रमाणे व्हायरल झाली.

 

अवेळी पावसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाऊस कवितांना सुरुवात झाली. यावेळी पावसाच्या कविता प्रेमाच्या नसून वाकड्यात शिरणाऱ्या होत्या एवढाच काय तो फरक. राग व्यक्त करताना लोकांनी भजी, समोसे आणि चहाचे जोरदार मार्केटिंगदेखील केले. ज्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये गर्दी असते अशा हॉटेलचालकांनी सोशल मीडियावर बेमोसमी पावसाची संधी साधून ‘आता आलाच आहात तर, घ्या भजी खाऊन’ असे म्हणत जाहिराती केल्या. पावसाचा सोशल मीडियावर बरसण्याचा हा अनुभव नवखा नसला तरी अगदी तत्काळ तयार होणाऱ्या शीघ्र पावसाळी कवितांचा कंटाळा यावा इतका वर्षाव होता. पावसामुळे घरात अडकलेली मंडळी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह दिसत होती. बातम्या सोशल अपडेट घेत लोकांनी एकमेकांना सतर्कही केले. पाण्यापासून आरोग्याचे रक्षण करण्याच्या टिप्स मोबाइलवर फिरत होत्या. एका दिवसासाठी नागरिकांनी सोशल पावसाळा अनुभवाला असे म्हणायला हरकत नाही. सर्व क्षेत्रातील मंडळींचा या फाॅरवर्डसमध्ये सहभाग होता. त्यात आम्ही आता आमच्या आई-वडिलांपेक्षा जास्त पावसाळे पहिले आहेत किंवा सुटी मिळाल्याची खंत व्यक्त करताना आम्ही शाळेत असताना ही वादळं कुठे गेली होती, असेही विनोद घडत होते. पावसाची मजा घरी बसून अनुभवणाऱ्यांचा दिवसभराचा खेळ सोशल मीडियावर पहायला मिळाला.

 

- आता नवीन ऋतू... . हिवसाळा..
- कुणाची पावसाळी पिकनिक राहिली असेल तर उरकून घ्या पटकन... तो आलाय परत..
- तोरण लावा आपल्या दारी, सुखाची किरणे येई घरी, पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, हिवाळ्यातल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा!
- यंदा हिवाळ्यात ही पावसाळा स्वेटर आणि रेनकोट दोन्ही घालण्याची संधी...!! होय मी लाभार्थी...!!!! हे माझं सरकार
- पुन्हा पावसाळा आला...आता दिवाळी येणार.. परत बोनस. होय हे माझं सरकार, आम्ही लाभार्थी
- मौसम मस्ताना, अजिबात गरज नसताना..
- काय आहे पाऊस पडत नाही म्हणून बेडकाचे लग्न करतात. आता परिस्थिती अशी आहे की त्या बेडकाचा घटस्फाेट घेतल्याशिवाय पाऊस काय थांबायचा नाही..

बातम्या आणखी आहेत...