आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तोडगा निघाला; मूर्ती गाळे ‘गोल्फ’वर, विक्रेत्यांच्या आंदोलनामुळे तणावपूर्ण वातावरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल हटविण्यास विक्रेते तयार नसल्याने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कठोर भूमिका घेत संबंधितांना हटविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सोमवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयाबाहेर तीन तास तणावपूर्ण वातावरण होते. पोलिस व राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीनंतर अखेर गोल्फ क्लब मैदानावर हे गाळे उभे करण्यास विक्रेत्यांनी सशर्त मान्यता दिली. त्याआधी सत्ताधारी मनसेनेही या ठिकाणी गाळे उभारण्यास विरोध करीत आयुक्तांना निवेदनही दिले.

जिल्हा रुग्णालयाबाहेरचा परिसर सायलेन्स झोन असल्याने तेथे गाळे उभारणीस परवानगी न देण्याचा निर्णय पालिका व पोलिसांनी घेतला होता. विक्रेत्यांनी मात्र गाळे उभारण्यास सुरुवात केल्याने पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सायंकाळी कारवाई सुरू केली. काही मूर्ती ताब्यात घेतल्यानंतर मूर्तिकारांनी संतप्त भूमिका घेत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात विरोध सुरू केला. त्यानंतर बबलू शेलार, नंदन भास्करे, सुशांत मालवंडे, महेश व्यवहारे, तेजस शिरसाठ, सागर मोटकरी आदींनी आक्रमक भूमिका घेत पथकाला विरोध केला. पोलिस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी व सहायक आयुक्त गणेश शिंदे हे फौजफाट्यासह आले. माजी महापौर विनायक पांडे हेही दाखल झाले व त्यांनी आयुक्त खंदारे यांच्याशी चर्चा होईपर्यंत कारवाई करू नये, अशी मागणी केली. मात्र, अतिक्रमण काढण्याचेच आयुक्तांचे आदेश असल्याचे सांगत बहिरम हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अखेर गोल्फ क्लब येथील जागेची राजकीय नेते, अधिकारी आणि विक्रेत्यांनी पाहणी करून ती जागा निश्चित केली.

मैदानात पूर्व बाजूने गाळे : गेल्या वर्षी गोल्फ क्लबवर गाळे उभारण्यास हरकत घेण्यात आली होती. राजदूत हॉटेलकडून मैदानात प्रवेश केल्यावर मूर्तींचे गाळे पूर्वेकडील भागात उभारण्याचे ठरवण्यात आले.

चर्चेअंती काय ठरले?
> गोल्फ क्लब मैदान पूर्वेकडील भिंतीलगत दीडशे गाळे उभे राहतील अशी व्यवस्था.
> महापालिकाच करणार स्वच्छता.
> प्रवेशव्दारासमोरील जागेत पार्किंग
>मैदानातील मशिदीबाहेर सुरक्षा कुंपण लावण्यात येणार.

गाळे उभारणीला आजपासून प्रारंभ
मंगळवारी सकाळपासून मैदानावर गाळे उभारणीच्या कामाला प्रारंभ होणार आहे. दोन दिवसात सर्वच गाळ्यांमध्ये मूर्ती नोंदणी करण्याकरिता उपलब्ध असतील, असे एका मूर्ती विक्रेत्याने सांगितले.

कायमची जागा द्या
दरवर्षी गणपती मूर्ती विक्रेते येथे गाळे उभारतात. त्यांचा त्रास कोणालाही होत नाही. मग प्रशासन असा हट्ट का करते? गाळ्यांच्या लिलावाच्या भानगडीत न पडता प्रशासनाने विक्रेत्यांना कायमस्वरुपी जागा द्यावी.
-विनायक पांडे, माजी महापौर

बाब स्पष्ट करावी
गोल्फ क्लब मैदानावर उभारलेले गाळे आक्षेप घेण्यात आल्याने गेल्या वर्षी काढावे लागले होते. यंदा आम्ही बाहेर गाळे टाकले तर त्यालाही विरोध सुरू आहे. विक्रेत्यांनी नक्की काय करावे हे प्रशासनाने प्रथमत: स्पष्ट करावे.
-बबलू शेलार, पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस

उपायुक्त ठरले करमणुकीचा विषय
उपायुक्त आर. एम. बहिरम यांनी गाळे हटविण्याची ठाम भूमिका घेतल्याने विक्रेत्यांनी त्यांना घेराव घातला. परंतु, ‘आयुक्तांचा फोन आला,’ असे पुटपुटत ते या घेरावातून बाहेर पडायचे. ही क्रिया सुमारे दहा-पंधरा वेळा झाल्याने ते काही काळ करमणुकीचा विषय ठरत होते.

गोल्फ क्लब मैदानावर सुविधा देऊ
यंदा जिल्हा रुग्णालयाबाहेर सायलेन्स झोनमध्ये गाळे उभेच राहू द्यायचे नाही, असा आयुक्तांचा आदेश आहे. त्याप्रमाणे आम्ही भूमिका घेतली आहे. गोल्फ क्लब मैदानावर विक्रेते जाण्यास तयार झाल्यास आम्ही अन्य सुविधा त्यांना उपलब्ध करून देऊ. लिलावाबाबतचा निर्णय आयुक्तांच्या उपस्थितीत घेता येईल.
- आर. एम. बहिरम, उपायुक्त, महापालिका

लिलावाने गाळे द्यावेत
गणेश मूर्ती विक्रीसाठी सरसकट गाळ्यांची विक्री न करता लिलाव पद्धतीने गाळे विक्रीस काढावेत. यामुळे सर्वच लाभार्थ्यांना त्याचा लाभ तर मिळेलच शिवाय पालिकेच्या उत्पन्नातही चांगली भर पडेल. मागील आठवड्यात यासंदर्भात आयुक्तांना निवेदन दिले आहे.
-अशोक सातभाई, गटनेता, मनसे