आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेच कायम: नाशकात गणेश मूर्ती विक्रेते मूळ जागेवरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जिल्हा रुग्णालय व गोल्फ क्लब मैदानाच्या भिंतीलगत गाळ्यांची उभारणी केलेल्या गणेशमूर्ती विक्रेत्यांनी महापालिकेचा तोडगा अमान्य करीत स्थलांतरित होण्यास ठाम नकार दर्शवला. महापालिका प्रशासनाने विक्रेत्यांना पर्यायी जागा म्हणून गोल्फ क्लब मैदानाची जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असतानादेखील बुधवारी एकाही गाळेधारकाने आधीची जागा सोडली नाही. गाळे स्थलांतर न झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महापालिका प्रशासनाने जाहीर नोटीस प्रसिद्ध करून विक्रेत्यांना गोल्फ क्लब मैदानावर जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवतानाच त्यासाठी लिलाव पद्धतीचा वापर करण्याचेही स्पष्ट केले. मात्र, ही नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत पूर्वीच्याच जागेवर, म्हणजे गोल्फ क्लब मैदान व जिल्हा रुग्णालयाच्या भिंतीलगत विक्रेत्यांनी गाळे उभारले आहेत. महापालिकेने सहा वर्षांपूर्वी शालिमार परिसरातून गणेशमूर्तीची विक्री करणार्‍या व्यावसायिकांना गोल्फ क्लब येथे स्थलांतरित केले होते. मात्र, जिल्हा रुग्णालय परिसर शांतता क्षेत्र जाहीर असल्याने पोलिसांनी त्यास विरोध दर्शविला होता. यंदाही तीच परिस्थिती निर्माण झाली असून दोन दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची दोन वाहने गाळ्यांसमोर ठाण मांडून आहेत.

आयुक्तच निर्णय घेणार : महापालिकेचे आयुक्त संजय खंदारे गेल्या दोन-तीन दिवसांपासून बाहेरगावी असल्याने गणेशमूर्ती स्टॉल्सविषयी अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. गुरुवारी आयुक्त आल्यानंतर विक्रेत्यांशी चर्चा होऊन हा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे.

ते काय सुविधा देणार?
विक्रेत्यांना महापालिकेने गोल्फ क्लब मैदान पर्याय म्हणून उपलब्ध करून दिले असले तरी अद्याप या मैदानावर प्रशासन कोणत्याही सुविधा देऊ शकलेले नाही. त्यामुळे यानंतरही प्रशासन सुविधा देईल की नाही, असा प्रश्न विक्रेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

बंदोबस्तात वाढ
जिल्हा रुग्णालयासमोरील गणेशमूर्ती व्यावसायिकांनी स्टॉल स्थलांतरित करण्यास ठाम नकार दर्शवल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस यंत्रणेने गोल्फ क्लब परिसरासह शहरातील बंदोबस्तात वाढ केली आहे.