आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात ढोल-ताशांच्या गजरात आले गणराय; हर्षोल्हासात प्रतिष्ठापना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- लाडक्या गणरायाच्या आगमनाने झालेला आनंद, ढोल-ताशांच्या ठेक्यावर ताल धरत घरोघरी आणि शहरातील 850 सार्वजनिक मंडळांच्या मंडपात सोमवारी गणराय विराजमान झाले. सकाळी 7 वाजेपासून घरोघरी गणरायाच्या प्रतिष्ठापनेची लगबग सुरू झाली, ती सार्वजनिक मंडळांच्या उशिरापर्यंत चाललेल्या गणेशमूर्ती स्थापनेपर्यंत कायम होती. ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर आणि ‘आले रे आले, गणपती आले’च्या जल्लोषाने महानगराचा आसमंत व्यापून गेला होता.

‘ढिंगचँग डिचँग’ आणि ‘धतडंग - ततडंग’चे ढोल सकाळी 9 वाजेपासूनच त्र्यंबकरोड परिसरातील स्टॉलबाहेर वाजू लागले. प्रचंड मोठे ढोल आणि वादकपथक सार्वजनिक गणेश मंडळांसमवेत, तर छोटी - छोटी वादकपथके लहान - मोठय़ा मंडळांना तसेच काही उत्साही कौटुंबिक गणरायांना घरी नेण्यास सज्ज झालेल्यांचा उत्साह वाढवत होती.

दुचाकी, रिक्षा, कार, ट्रॅक्स, टेम्पोवरून आले गणराय : घरांमधील गणरायांच्या बहुतांश मूर्ती आणण्यासाठी नागरिकांनी दुचाकी आणि रिक्षांचा वापर केला. त्यामुळे त्र्यंबक नाका परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. तर लहान - मोठय़ा मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मूर्ती आणण्यासाठी ट्रॅक्स, टेम्पो अशा वाहनांना प्राधान्य दिले. तर चारचाकीधारकांनी गोल्फ क्लबच्या आसपास त्यांची वाहने पार्क करून गणेशमूर्ती नेऊन त्यांची प्रतिष्ठापना केली. बहुतांश घरांतील तीन -चार सदस्य गणरायाला आणण्यासाठी सजून -धजून आले होते.

गुरुजींची लगबग

अनेक घरांमध्ये गुरुजींकडून प्राणप्रतिष्ठा करून घेण्याची परंपरा असल्याने काही नागरिकांनी रविवारीच गणेशमूर्ती घरी आणून लाल कपड्याने झाकून ठेवल्या होत्या. त्या मूर्तींची प्रतिष्ठापना होण्यास अनेक घरांमध्ये सोमवारी सकाळी 7 वाजेपासूनच गुरुजींची लगबग सुरू होती. तर दुपारी गणेश मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी गुरुजींची धावपळ सुरू असल्याचे चित्र होते. घरांतील प्रतिष्ठापनेसाठी दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत, तर गणेश मंडळांच्या गुरुजींना मंडळाच्या परंपरेनुसार दक्षिणा दिली जात होती.

ढोल -ताशांना मोठी मागणी
सकाळी घरगुती गणरायांच्या मूर्ती नेण्यास प्रारंभ झाल्यापासूनच छोट्या ताशांचे चार जणांचे पथके तीनशे रुपयांत उपलब्ध होते, तर दुपारी मोठी मंडळे मूर्ती घ्यायला दाखल होऊ लागली तेव्हा पथकाचे दर किमान पाचशे ते दोन हजारांवर गेले होते. रविवार कारंजावर माऊली प्रतिष्ठानच्या वतीने दुपारी 26 ढोलांचा गजर करीत सिद्धिविनायकाला मानवंदना दिली.

भाविकांच्या गर्दीने फुलले शहरातील रस्ते

प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्याने काही काळ वाहतूक कोंडी

प्रतिनिधी
नाशिक- श्रीची स्थापना करण्यासाठी सकाळपासून शहरात गणेशभक्तांची मोठी मांदियाळी होती. संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेने शहरातील प्रमुख मार्ग बंद करून पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळवल्याने या मार्गांवर काही काळ वाहतूक कोंडी होत होती.

मूर्ती खरेदीसाठी गर्दी होणार, हे गृहीत धरत शहर वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात बदल केला होता. जिल्हा रुग्णालय परिसरात गणेशमूर्ती विक्रीचे गाळे असल्याने सकाळपासूनच त्र्यंबकरोडवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मोडक सिग्नल ते भवानी (मायको) सर्कल परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. गणेशमूर्ती घेऊन जाणार्‍या वाहनांनाच परवानगी देण्यात येत होती. या मार्गावरील वाहतूक बंद असल्याने मोडक सिग्नल ते गडकरी सिग्नल व सीबीएसमार्गे कॅनडा कॉर्नरकडून पुढे वाहतूक वळविण्यात आली होती. शहरातील हे मुख्य मार्ग बंद असल्याने अन्य भागांत काहीवेळ वाहतूक कोंडी होत होती. वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडल्याने वाहनांच्या ठिकठिकाणी लांब रांगा लागल्या होत्या.

या मार्गावर झाली होती कोंडी
त्र्यंबकरोड व मायको सर्कल वाहतुकीस बंद असल्याने शरणपूररोड, उंटवाडीरोड मार्गावर वाहतूक कोंडी होत होती. तर, जिल्हा रुग्णालय परिसरातील नवीन बसस्थानक, मोडक सिग्नल, सीबीएस, गडकरी चौक व पुढे जिल्हा परिषदेपर्यंत कोंडी होती.

खरेदीसाठी गर्दी
श्रीच्या स्थापनेसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याकरिता रविवार कारंजा भागात मोठी गर्दी झाल्याने येथेही काही वेळ वाहतूक कोंडी होत होती. या कोंडीमुळे होळकर पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागत होत्या.

पावसामुळे धावपळ
काही दिवसांपासून रुसून बसलेला वरुणराजाही श्रीच्या स्थापनादिनी बरसल्याने काही ठिकाणी गणेशमूर्तींचे रक्षण करण्याकरिता भक्तांसह मंडळाच्या कार्यकर्त्यांची धावपळ उडाली होती.