आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मूर्ती विक्रेत्यांपुढे नाशिक प्रशासनाचे लोटांगण; त्र्यंबकरोडच्या दुतर्फाच थाटणार गाळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राजकीय दबाव व काही ठराविक लोकांपुढे लोटांगण घालत महापालिका प्रशासनाने माघार घेत काही अटी-शर्तींवर त्र्यंबकरोडच्या दुतर्फा गणेशमूर्ती विक्रीचे गाळे थाटण्यास शुक्रवारी परवानगी दिली. यामुळे गाळे उभारण्यावरून प्रशासन व विक्रेत्यांमध्ये झालेला वाद दिखाऊच असल्याचे समोर आले आहे.

गेल्या आठवडाभरापासून त्र्यंबकरोडवरील गणेशमूर्ती विक्रीची दुकाने थाटण्यास सुरुवात झाली होती. त्यास पालिका व पोलिस यंत्रणेने हरकत घेतल्याने वाद निर्माण झाला होता. त्र्यंबकरोडऐवजी गोल्फ क्लब मैदानावर दुकाने उभारण्यासाठी प्रशासनाने पर्याय सुचविला. काहींनी त्यास विरोध दर्शविला. याबाबत महापौर अँड. यतिन वाघ यांच्यासोबत झालेल्या चर्चेवेळी गजानन शेलार, हरिभाऊ लोणारी, मनसेचे गटनेता अशोक सातभाई, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आर. एम. बहिरम आदी उपस्थित होते. त्यात अंतिम चर्चेत दुकाने त्र्यंबकरोडवरच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अशा आहेत अटी-शर्ती
> गाळ्यांपुढे इतर विक्रेत्यांचे अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
> जलतरण तलाव सिग्नलपर्यंत एकही गाळा राहणार नाही.
> प्रत्येक गाळ्याचा आकार 10 बाय 10 इतकाच असेल.
> गाळे भाडेवाढीत मागील वर्षापेक्षा 10 टक्के वाढ, 500 ऐवजी 550 रुपये भाडे.

तो निर्णय पालिकेचाच
जिल्हा रुग्णालयासमोरील दुकाने हटविण्यासाठी आवश्यक तो बंदोबस्त महापालिकेला पुरविण्यात आला होता. पोलिस यंत्रणेने परवानगी नाकारलेली आहे. आता परवानगी देण्याचा निर्णय महापालिकेचाच आहे. जिल्हा रुग्णालयाने हरकत घेणे गरजेचे होते.
-कुलवंतकुमार सरंगल, पोलिस आयुक्त