आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशमूर्ती गाळ्यांचा चेंडू पालिकेच्या कोर्टात;पोलिसांकडून आठवडाभरापूर्वीच पत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्हा शासकीय रुग्णालयाचा परिसर शांतता क्षेत्र घोषित केलेले असताना, महापालिकेने या ठिकाणी गणेशमूर्ती विक्री गाळ्यांना परवानगी देऊन शांतता क्षेत्राचे उल्लंघन न करण्याविषयीचे पत्र आठवडाभरापूर्वीच दिल्याचे पोलिसांनी सांगितल्याने आता महापालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, पालिकेकडून गाळ्यांविषयी परवानगीबाबत कुठलेही पत्र मिळालेले नसल्याचा दावाही उपआयुक्त संदीप दिवाण यांनी केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच त्र्यंबकरोडवर दुतर्फा गणेशमूर्ती विक्रीचे गाळे थाटले जातात. त्यामुळे या ठिकाणी पंधरा ते वीस दिवस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी होऊन वाहतूक कोंडी होते. त्यातच वाहनांचे कर्कश हॉर्न, गणेशमूर्ती खरेदीसाठी येणारे कार्यकर्ते ढोल-ताशा, डीजे, वाद्य वाजवत मूर्ती नेतात. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांना प्रचंड त्रास होतो. त्यातच गर्भवती महिला, अपघातग्रस्त रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. या गाळ्यांना जिल्हा रुग्णालयाकडूनही आक्षेप घेतला जातो. दरवर्षीप्रमाणे महापालिकेकडून सुरुवातीला विरोधाची भूमिका घेतली जात असली तरी दोन-चार दिवसांवर गणेशोत्सव आला की धार्मिक भावनांचे कारण पुढे करीत परवानगी दिली जात असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी याबाबत गणेशमूर्ती विक्रेते, पोलिस व महापालिका यांच्यात बैठक होऊन एकत्रित तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. यासाठी पर्यायी जागाही सुचविण्यात आली. फटाके विक्रेत्यांना डोंगरे वसतिगृहावर जागा दिली, तशीच या विक्रेत्यांनाही इतरत्र जागा सुचविण्याची मागणी जिल्हा रुग्णालय व नागरिकांकडून केली जात आहे. परंतु, महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी हेतुत: दुर्लक्ष करीत असल्याने यामागे अर्थकारण लपल्याचे उघडपणे बोलले जात आहे.
नियम उल्लंघन नको
जिल्हा रुग्णालयाचे आवार शांतता क्षेत्र घोषित करण्यात आले असून, त्याचे उल्लंघन होऊ नये. महापालिकेने गाळ्यांना परवानगी न देण्यासाठी पत्र देऊनही तेथे गाळे उभारणी सुरू असून, महापालिकेच्या जागेवर विनापरवानगी गाळे उभारले जात असल्याची तक्रार दिल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले जाऊ शकतात. मात्र, यासंदर्भात अद्याप महापालिकेचे कुठलेही पत्र मिळालेले नाही.
संदीप दिवाण, उपआयुक्त