आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवानगीविना सिव्हिलसमोर गणेशमूर्तींचे स्टॉल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - त्र्यंबकरोडवरील सिव्हिल अर्थातच जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर यंदाही गणेशमूर्ती विक्रेत्यांनी परवानगी मिळण्यापूर्वीच महापालिकेच्या नाकावर टिच्चून स्टॉल अर्थातच गाळे उभारणीला रविवारी सुरुवात केली. विशेष म्हणजे, शांतता क्षेत्रात परवानगी नसल्याचे सांगणार्‍या पोलिसांनीही याबाबत बघ्याची भूमिका घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांना दुखावणे परवडणारे नसल्यामुळे यावर महापौरांपासून पदाधिकार्‍यांपर्यंत कोणीही बोलण्यास तयार नाही.

गेल्या दोन वर्षांपासून त्र्यंबकरोडवरील गणेशमूर्तींसाठी उभारले जाणारे स्टॉल वादात आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही विक्रेत्यांनी त्र्यंबकरोडवरील जागा मिळण्यासाठी पालिकेकडे अर्ज केला. मात्र, या ठिकाणी खासगीकरणाद्वारे दुभाजक तसेच सौंदर्यीकरण केले जात असल्यामुळे जागा देण्याचा निर्णय महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या कोर्टात गेला. महापौरांनी बबलू शेलार यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या विक्रेत्यांशी चर्चा केली. संबंधित रस्ता शांतता क्षेत्रात येत असल्याने पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय स्टॉलला परवानगी देता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर माध्यमांशी बोलतानाही महापौरांनी असेच सांगितले होते. प्रत्यक्षात पोलिस उपायुक्त संदीप दिवाण यांनी गाळ्यांना परवानगी दिली जाणार नाही, असे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. यासंदर्भात पालिका व पोलिसांमधील टोलवाटोलवी बघून रविवारी त्र्यंबकरोडवर स्टॉल उभारणीला सुरुवात झाली.
गेल्या वर्षीचाच फंडा यंदाही
पोलिस व पालिका यांच्यात परवानगीबाबत टोलवाटोलवी होते, हे लक्षात घेऊन यंदाही विक्रेत्यांनी स्टॉल उभारणी सुरू केली आहे. विक्रेते राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याने त्यांना जाब विचारण्यास कोणीही तयार नाही. या स्टॉलचा त्रास सामान्य नागरिकांना होणार असून, या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी मनसे काय भूमिका घेते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
उपायुक्तही रजेवर
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम हे सुटीवर असल्यामुळे आता परवानगीचा विषय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विक्रेत्यांबरोबर चर्चा करून पर्यायी जागा वा भाडेतत्त्वावर हीच जागा देण्याचा विषय होण्याची चिन्हेही कमी आहे.