आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवर्धनला गणेश विसर्जनास बंदी, दुगाव फाट्यावरील बॅरिकेडिंगमुळे टीका हाेण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्तींचे संकलन आणि त्यांची योग्य विल्हेवाट लावण्याची योग्य व्यवस्था तालुका प्रशासनाकडे नसल्याने अखेर तहसीलदारांनी गोवर्धन परिसरात विसर्जनास मज्जाव केला असून, गणेशभक्तांना आता धोकेदायक सोमेश्वर धबधबा परिसरात गणेश विसर्जन करावे लागणार आहे. तसा निर्णयच तहसीलदारांनी बुधवारच्या बैठकीत घेतला आहे. शिवाय, सोमेश्वरपर्यंत एकेरीच वाहतूक सुरू ठेवण्यात येणार असल्याने भाविकांना आता गंगापूर गावातून वळसा घालून पुन्हा नाशिककडे यावे लागणार आहे.
तहसीलदार राजश्री आहिरराव -गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली गणेश विसर्जनाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्थानिक नागरिकांना फारशी कल्पना देताच केवळ गोवर्धन परिसरात गणेश विसर्जनाची संख्या अधिक असल्याने संकलन केलेल्या मूर्तींची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने यंदा थेट या परिसरात मूर्ती विसर्जनास मज्जाव करण्याचा अजब निर्णय तहसीलदारांनी घेतला. त्यामुळे या परिसरातील भाविकांना आता गंगापूर आणि गोवर्धन शिवारात मूर्ती विसर्जन करताच येणार नाही. भाविकांना पायपीट करत सोमेश्वर धबधब्याजवळील बालाजी मंदिर परिसरातील गोदापात्र ते पुढे रामकुंडापर्यंत कोठेही गणेश विसर्जन करावे लागणार आहे. शिवाय, वाहतूकही एकेरी केल्याने सोमेश्वरपासून अगदी एक िकलाेमीटरवर राहणाऱ्या किंवा आनंदवल्ली परिसरातील नागरिकांनाही गंगापूर गावातून वळसा घालून यावे लागणार आहे. शहरातील एकही मूर्ती गोवर्धनच्या पुढे विसर्जनास जाऊ दिली जाणार नाही. एवढेच काय, तर दुगाव फाट्यावर बॅरिकेडिंग केले जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनाही गंगापूर अथवा गोवर्धनला किंवा तेथून सातपूर किंवा त्र्यंबकेश्वर रस्त्याकडे जावयाचे असल्यास चांदशीमार्गे जाण्याची मोठी कसरत करावी लागणार असल्याने आता सिंहस्थाप्रमाणेच बॅरिकेडिंगच्या जाचावर भाविकांकडून टीकेसह नाराजी व्यक्त होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
बातम्या आणखी आहेत...