आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एमबीबीएस’ला बोगस प्रवेश देणारी पुण्याची टोळी जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वैद्यकीय प्रवेशासाठी एकीकडे शासनाकडून ‘नीट’द्वारे प्रवेशप्रक्रिया राबवली जात असताना, मविप्रच्या मेडिकल महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाला पुण्याच्या एका टाेळीकडून बोगस प्रवेश मिळवून दिले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समाेर अाले अाहे. महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी सतर्कता दाखवल्याने शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी ५.३० वाजता महाविद्यालयाच्या आर्थो गॅलरीमध्ये हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात संशयितांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आडगाव पोलिसांनी दिलेली माहिती आणि लिपिक दीपक सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मेडिकल महाविद्यालयाच्या आवारात तीन उच्चभ्रू तरुण फिरत होते. महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मृणाल पाटील या सायंकाळी कार्यालयातून बाहेर येत असताना त्यांनी संशयितांना कुठल्या वर्षाला शिक्षण घेत असल्याची विचारणा केली. मात्र, संशयितांनी अपेक्षित उत्तर दिल्याने संशय बळावला. त्यांनी तत्काळ सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांना बोलावून घेत संशयितांना ताब्यात घेतले. सुरक्षारक्षकांनी त्यांच्याकडील बॅगची तपासणी केली असता त्यात बनावट शिक्के आणि कागदपत्रे अाढळून आली. सोनवणे यांनी तत्काळ आडगाव पोलिसांशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला. काही वेळात पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. चौकशीमध्ये संशयितांनी शशांक शैलेश सिंग, अनंत अनिरुद्ध त्रिपाठी, अंकुर अशोककुमार वर्मा (सर्व रा. आकुर्डी, पुणे) अशी नावे सांगितली अाहेत.
पोलिसांनी संशयितांकडून मेडिकल कॉलेज संस्थेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट शिक्के, कागदपत्रे बाळगल्याचे सांगत सर्व साहित्य जप्त केले.
दरम्यान, मविप्र संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी देशभरातून विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करतात. तीन वर्षांपूर्वी हरियाणा आणि पुण्याच्याच एका टोळीने या विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संपर्क साधून प्रवेश देण्याचे अामिष देत सुमारे २५ आणि ३० लाखांची फसवणूक केल्याचे दोन प्रकार घडले होते. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात अाले हाेते. तत्कालीन निरीक्षक सुभाष डवले आणि डॉ. सीताराम कोल्हे यांनी टोळीच्या सदस्यांना अटक केली हाेती. मात्र, मुख्य संशयित फरार झाले होते. अाता ताब्यात घेण्यात अालेल्या टोळीकडूनदेखील अशाच प्रकारे प्रवेशाचे अामिष दाखवित अार्थिक फसवणूक केली गेली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वरिष्ठ निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जगदाळे, हवालदार संजय जाधव अधिक तपास करीत आहेत.

संशयितांची चौकशी सुरू
^वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना बनावट प्रवेशपत्र देत लाखोंच्या फसवणुकीचे प्रकार यापूर्वी घडले अाहेत. संशयितांकडून बोगस प्रवेश देण्याचे आणखी प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. या टोळीची सर्व माहिती मिळाली आहे. सखोल तपास करून संशयितांवर कडक कारवाई केली जाईल. -संजय सानप, वरिष्ठ निरीक्षक, आडगाव पोलिस ठाणे
बातम्या आणखी आहेत...