आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचवटीमध्ये टाेळीयुद्ध, चांगले गँगच्या समर्थकावर गोळीबार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अंबडमध्ये टिप्पर गँगमध्ये वर्चस्वाच्या लढाईतून तडीपार गुंडाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या घटनेस काही तास उलटत नाही तोच पंचवटीमध्ये दोन गँगमध्ये भडका उडाला अाहे. चांगले गँगच्या समर्थकावर गोळीबार करून दोन दिवसांत मोठा धमाका करण्याची धमकी देत गुन्हेगार फरार झाले. रविवारी मध्यरात्री हनुमानवाडी येथे हा थरारक प्रकार घडला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी यंत्रणेकडून काही दिवसांपासून धडाकेबाज कारवाई सुरू आहे. या कारवाईचा धसका घेतल्याने गुन्हेगार शहरातून हद्दपार झाले होते. गुन्हे आटोक्यात आले होते. मात्र, अंबड आणि पंचवटीमध्ये दोन गँग एकमेकांसमोर आल्याने शहरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवधूत मधुकर गायकवाड (३२) यांच्यावर रात्री काही अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केल्याचा प्रकार घडला. तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार अजिंक्य चव्हाण याची टिप्पर गँगच्या सदस्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी चार संशयितांना पोलसांनी काही तासांच अटक केली. ही घटना ताजी असताना पंचवटीमध्ये चांगले गँगच्या समर्थकावर गोळीबार करण्यात आल्याने टोळ्यांकडून पोलिस यंत्रणेला आव्हान दिले जात आहे. पंचवटीमध्ये परदेशी आणि चांगले गँगमध्ये भडका उडाल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. भीतीपोटी गायकवाड यांनी पोलिसांत तक्रार देण्याचा पवित्रा घेतला. वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी सुरक्षेची हमी दिल्यानंतर गायकवाड यांनी तक्रार दिली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू होता.
कच्च्या बच्च्यांकडे दुर्लक्ष
पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेनंतर बहुतांशी ‘भाई’ कारागृहात आहेत. मात्र, या ‘भाईं’च्या समर्थकांकडून आपलीही ‘भाई’प्रमाणे दहशत निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू अाहेत. यातील बहुतांशी समर्थक पोलिस रेकॉर्डवर नाहीत. पोलिसांनी आता ‘भाईं’च्या या समर्थकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागारिकांकडून करण्यात येत अाहे.

संशयितांच्या मागावर दाेन पथके
गोळीबारझाल्याची अफवा पसरल्याचे सुरुवातीला वाटत होते. मात्र, पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेत परिसरातील सीसीटीव्ही तपासणी केल्यानंतर संशयित त्यामध्ये कैद झाल्याचे निदर्शनास आहे. रात्रीच दोन पथके संशयितांच्या मागावर पाठविण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...