आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूर धरण 61 टक्के भरल्याने नाशिक शहरवासीयांना दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने मंगळवारी शहरात आणखी जोर धरला. दिवसभर बरसणार्‍या पावसामुळे सिडको व जुन्या नाशकासह अनेक भागात पाणी साचले. घरांत पाणी शिरल्याने अनेक नागरिक बेजार झाले. दुसरीकडे, गंगापूर धरण 61 टक्के भरल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला. मंगळवारी शहरात 6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

रस्त्यांवरून रहदारीबरोबरच पाणीही झपाट्याने वाहत होते. त्याचा परिणाम बाजारपेठांवर झाला. आधीच खराब झालेल्या रस्त्यांची अवस्था या पावसामुळे आणखी वाईट झाल्याने वाहनचालकांना खड्डे टाळण्यासाठी त्यांचे सर्व कौशल्य पणाला लावावे लागले. जागेजागी साचलेल्या डबक्यांतून मार्ग काढताना दुचाकीस्वारांना मोठी कसरतही करावी लागली. अनेकांना तर डबक्यांतून हातानेच वाहने ढकलावी लागल्याने त्यांची चांगलीच दमछाक झाली. पावसाचा जोर सायंकाळीही कायम राहिल्याने शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.

दरम्यान, गंगापूर धरण समूहाच्या साठय़ात वाढ झाल्याने मागील वर्षीप्रमाणे यंदा पाणीटंचाईची समस्या शहरवासीयांना भेडसावणार नसल्याचे समाधानकारक चित्र ताज्या पावसाने निर्माण झाले आहे. गंगापूर धरण 61.13 टक्के भरले असून, गेल्या सहा दिवसांत साठय़ात आठ टक्के वाढ झाली आहे. पुढील 24 तास अशीच संततधार राहण्याचा अंदाज असल्याने साठय़ात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

धरणाच्या जलस्रोतांचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात अनुक्रमे 22 व 51 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जुलैत या दोन्ही तालुक्यांत अनुक्रमे 936 व 1339 मिलिमीटर पाऊस पडला आहे. परिणामी, धरणांची पातळी वाढली आहे. दारणा व मुकणे धरणातून अनुक्रमे 4490 आणि 481 क्यूसेक पाणी आतापर्यंत सोडले आहे.


नेमेचि येतो पावसाळा अन् नेहमीच साचते पाणी..
आमच्या घराजवळच पाणी साचले आहे. बाहेर पडण्याचीही अडचण आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्याची कुठलीही व्यवस्था केलेली नसल्याने व महापालिकेचे अधिकारीही त्याकडे लक्ष देत नसल्याने हा त्रास नेहमीच सहन करावा लागत आहे. जगन्नाथ मंडलिक, शिवशक्ती चौक, सिडको