नाशिक - नियोजन करूनही तीनदा रद्द झालेल्या गंगापूर धरणावरील सी-प्लेन लँडिंगचा शुक्रवारचा मुहूर्त चौथ्यांदा टळला आहे. पुढील आठवड्यात ही सफर चाचणी घेण्यात येणार आहे. मात्र, अद्याप त्याची तारीख निश्चित झाली नसून, ती निश्चित होताच प्रशासनास कळविण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले. परंतु, पुढील आठवड्यातही त्याचे लँडिंग होते की नाही, याबाबत शंकाच आहे.
जुहू चौपाटी ते गंगापूर धरण अशी सी-प्लेन सेवा सुरू करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यानुसार, तीन वेळा पूर्ण नियोजन होऊनही ते रद्द झाल्यानंतर शुक्रवारी होणारच असल्याचे मेरीटाइम एनर्जी हेली एअर सर्व्हिसेस (मेहेर) कंपनीने सांगितल्यावरही त्याबाबत शंका व्यक्त केली जात असताना, सी-प्लेन चाचणीची सफर रद्द झाली आहे.
शुक्रवारी सकाळी वाजता प्लेन जुहू चौपाटीवरून उड्डाण करून ८.४० वाजता गंगापूर धरणावर उतरणार होते. त्यानंतर लगेच ९.१५ वाजता गंगापूर धरणावरून टेक-ऑफ करत ९.५५ ला जुहूला लँड करणार असल्याचेही पूर्ण नियोजन करण्यात आले होते. मात्र, ते अचानक रद्द करण्यात आल्याचे मेहेर कंपनीने स्पष्ट केले. काही प्रशासकीय अडचणींमुळेच ते रद्द केले आहे. पुढील तारीख अद्याप निश्चित नसल्याचे सांगून ती ठरताच जिल्हा प्रशासनास कळविले जाणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
तोपर्यंत परवानगी नाही
सी-प्लेन लँडिंगसंदर्भात परवानगी घेतलेली नाही. तसेच, जोपर्यंत सुरक्षा आणि इतर बाबींची सर्व माहिती प्रशासनाला कळवत नाहीत तोपर्यंत त्यांना कुठलेही ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. - विलास पाटील, जिल्हाधिकारी