आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुणराजाच्या कृपेने पाणीकपात झाली रद्द; दिवसातून एकदाच मात्र पूर्ण क्षमतेने होणार पुरवठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गंगापूर धरणामध्ये 80 टक्के पाणीसाठा झाल्यामुळे गत 24 दिवसांपासून नाशिक शहरात सुरू असलेली पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महापालिकेचे प्रभारी आयुक्त संजीवकुमार यांनी घेतला आहे. मात्र, शहरातील सर्व विभागांमध्ये सद्यस्थितीतील वेळापत्रकानुसार दिवसातून एकदाच, परंतु पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जाणार आहे. ज्या भागात सरासरी दोन तास पाणी येते त्या भागात अर्धा तासाची वाढ होईल. हा निर्णय शनिवारपासून (दि. 2) अंमलात येण्याची शक्यता आहे.
जून आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने गंगापूर धरणाने तळ गाठला होता. अल निनोच्या संकटाने पाऊस लांबण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत 25 टक्के पाणीकपात जाहीर केल्यानंतर नाशिक महापालिकेनेही 7 जुलैपासून शहरात पाणीकपात लागू केली होती. गंगापूर धरण समूहामधून कपातीनंतर शहराला दिवसाला 400 दशलक्ष लिटर दैनंदिन पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे 60 दशलक्ष लिटर पाण्याची बचत दररोज होऊ लागली. कपातीपूर्वी सिडको आणि सातूपर वगळता पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिकरोड या भागात दोन वेळा पाणीपुरवठा होत होता. कपातीनंतर सर्वच विभागांमध्ये एकदाच पाणीपुरवठा होऊ लागला. जुलैच्या उत्तरार्धात पावसाचे दमदार आगमन झाले. त्यात आठवडाभराच्या पावसाने गंगापूर धरण 80 टक्के भरले. त्यानंतर मनसेच्या नगरसेवकांनी पाणीकपात रद्द करण्याचा महापौरांकडे आग्रह धरला. शुक्रवारी सायंकाळी आयुक्त संजीवकुमार यांनी दिवसातून एकदा, मात्र पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.
त्याबाबतची माहिती सभापती सचिन ढिकले यांनी दिली.
महापौर अनभिज्ञ : पाणीकपात करण्याचा निर्णय महापौरांनी घेतला होता. मात्र, कपात रद्द करण्यासाठी सभापती राहुल ढिकले यांनी पुढाकार घेतला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी मनसेला पाणीकपातीचा रोष त्रासदायी ठरण्याची शक्यता होती. कपात हटविण्यासाठी प्रशासन अनुकूल होते, ही संधी साधून ढिकले यांनी नगरसेवक यशवंत निकुळे यांच्यासह आयुक्तांची भेट घेऊन ही मागणी लावून धरली. दरम्यान, या निर्णयाबाबत महापौर अ‍ॅड. यतिन वाघ अनभिज्ञ होते. कार्यक्रमात ते व्यस्त असल्याने या निर्णयाबाबत माहिती नसल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
सर्वानुमते निर्णय
गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने प्रशासनाबरोबर चर्चा करून पाणी कपात रद्द करण्यासाठी प्रयत्न केले. काही भागात भीषण पाणीटंचाई होती, कपातीमुळे ती दूर होणार आहे. नागरिकांनी तरीही जपून पाणी वापरावे.अ‍ॅड. राहुल ढिकले, सभापती, स्थायी समिती
पाणीकपातीतून बचतीचा साधला फंडा
कपातीपूर्वी सुरू असलेल्या दोन वेळच्या पाणीपुरवठ्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती होणे तसेच पाणीचोरीचे प्रकारदेखील घडत होते. पाणीकपातीमुळे एकदाच पाणी येण्याची सवय नाशिककरांना लागल्याचे गृहीत धरून पूर्ण क्षमतेने मात्र दिवसातून एकदाच पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. कपातीच्या आडून बचतीचा फंडा आता लोकांना सोसवणार का, ते पाहणे रंजक ठरणार आहे.