आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातृतीय, चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचार्यांच्या पगारातून मेन्टेनन्सच्या स्वरूपात मासिक रक्कम कपात केली जाते. मात्र दुसरीकडे, या शासकीय वसाहतींची डागडुजीच होत नाही. इमारतींची पडझड, तुटलेले दरवाजे, वाढलेले गाजर गवत, अस्वच्छता, डासांचा उपद्रव, बंद पथदीप यांसह अनेक समस्यांच्या गर्तेत शासकीय वसाहती सापडल्या आहेत. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही या वसाहतीतील कर्मचार्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही. या वसाहतीच्या दुर्दशेवर डी. बी. स्टारने टाकलेला प्रकाशझोत..
त्र्यंबक रोडवरील पाटबंधारे विभागाशी संबंधित असलेली ‘गंगोत्री’ या शासकीय कर्मचार्यांच्या वसाहतीतील रहिवाशांकडून वर्षाला अडीच लाखांहून अधिक रक्कम डागडुजीसाठी घेतली जात असूनही या वसाहतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दहा वर्षांत तब्बल 27 लाख रुपयांचा मेन्टेनन्स दिला गेला असला तरी, वसाहतीतील सदनिकांची एकदाही दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे कपात केली जाणारी रक्कम नेमकी कशावर खर्च केली जाते, असा सवाल रहिवासी उपस्थित करीत आहेत.
घरे मिळाली, सुविधांचे काय ?
शासकीय कार्यालयांतील कर्मचार्यांना कायमस्वरूपी निवासस्थान मिळावे, या उद्देशाने शहरात ठिकठिकाणी वसाहती उभारण्यात आल्या आहेत. शहरातील प्रमुख शासकीय कार्यालय त्र्यंबकरोड तसेच शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये असल्याने येथे काम करणार्या कामगारांना ये-जा सोयीचे व्हावे या उद्देशाने त्र्यंबकरोड परिसरात वेगवेगळ्या शासकीय विभागांच्या वसाहती बांधल्या आहेत. नोकरीनिमित्त विविध ठिकाणाहून आलेले कामगार कुटुंबीयांसह या वसाहतीत राहतात. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून या कुटुंबांना कोणत्याच सुविधा दिल्या पुरवल्या जात नाहीत, हे उघड झाले आहे.
‘गंगोत्री’ असुविधांची
त्र्यंबकरोडवरील जलतरण तलावासमोर उपविभागीय अभियंता, उपविभाग नाशिक डावा कालवा या विभागातील कर्मचार्यांसाठी सुमारे 32 क्वार्टर्सची गंगोत्री वसाहत उभारली आहे. त्यातील रहिवासी वर्षाला लाखो रुपयांचा मेटेंन्सस भरतात. परंतु, प्रशासनाकडून त्यात नियमित देखभाल केली जात नाही. रहिवाशांकडून सोयी-सुविधांसाठी 880 रुपये महिना मेंटेनन्स स्वरूपात घेतले जातात.
मेंटेनन्सचे दर वर्गानुसार अधिकार्यांना वेगवेगळे आहेत. साधारणपणे 400 ते 900 रुपयांपर्यंत कपात होते. 32 क्वार्टर्सकडून वर्षाला अडीच लाखांहून अधिक मेंटेनन्स घेतला जातो. मात्र, वसाहतीच्या देखभालीवर त्यातील एकही पैसा खर्च केला जात नाही. ‘वरिष्ठ अधिकार्यांच्या वसाहतीत सर्व सुविधा पुरवल्या जातात, परंतु, आमच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते,’ अशा प्रतिक्रिया रहिवासी महिलांनी व्यक्त केल्या.
पैसे घेऊनही गैरसोय
बहुतांश घरांतील दरवाजे मोडकळीस आले आहेत. पावसाळ्यात घरात पाणी येते. दुरुस्तीसाठी पैसे घेतले जात असूनही सुधारणा दूरच; देखभालही केली जात नाही. पैसे घेऊनही सुविधा देणार नसाल, या पुढे पैसे न भरता वसाहतीची देखभाल करू. शोभा गांगुर्डे, गृहिणी
आरोग्य महत्त्वाचे
साफसफाई होत नसल्याने वसाहतीत सर्वत्र अस्वच्छता आहे. कचर्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. वारंवार तक्रारी करूनही लक्ष दिले जात नाही. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनीषा जाधव, गृहिणी
देखभाल व्हावी
वसाहतीची प्रचंड दुरवस्था झाली असून, तिची देखभाल व दुरुस्ती होण्याची गरज आहे. सदनिकांची पडझड होऊ लागली आहे. त्यामुळे तातडीने डागडुजी करण्याची गरज आहे. शीतल गणगे, गृहिणी
कमी दाबाने येते पाणी
येथे पाण्याची समस्या कायम असून नेहमीच कमी दाबाने पाणी येते. पाइप ठिकठिकाणी तुटल्यामुळे पुरेसे पाणी येत नाही. ड्रेनेजचीही दुरवस्था झाल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. शौचालयांचे दरवाजे तुटले आहेत. संगीता सोनवणे, रहिवासी
थेट प्रश्न सुनील बाफना, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे
0 पाटबंधारे कर्मचारी वसाहतींत सुविधा पुरवल्या जातात का?
- हो, पालिका प्रशासन तेथे सर्व सुविधा देते. पथदीप, पाणीपुरवठा, स्वच्छता या सर्व सुविधा पालिकेकडून दिल्या जातात.
0 डागडुजी का केली जात नाही? : वसाहतीच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून पैसा येत नाही. त्यामुळे डागडुजीचे काम होत नाही.
0 कर्मचार्यांच्या मेन्टेनन्सचे पैसे कशावर खर्च केले जातात?
- पगारातून कपात होणारे मेन्टेनन्स स्वरूपातील पैसे वसाहतीतील सुविधांसाठीच खर्च होतात. वीजबिल, पाणीपट्टी, घरपट्टी यांसह कर भरले जातात. पथदीप, पाणी, स्वच्छता पालिका देते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.