आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तडीपार गुंडाची गोळ्या झाडून उपेंद्रनगरला हत्या, कुख्यात टिप्पर गँगमध्ये सूत्रे हाती घेण्यावरून भडका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुख्यात टिप्पर गँगची सूत्रे हाती घेण्याच्या वादातून सराईत गुन्हेगाराची टोळीतील सदस्यांनीच गोळ्या झाडून हत्या केल्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री उपेंद्रनगर येथे घडला. या घटनेनंतर सहा तासांत सिनेस्टाइल पाठलाग करून चार संशयितांना सिन्नर येथून पाेलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी अंबड पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मृत गुन्हेगाराच्या वडिलांनी मुलाचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतल्याने ‘फादर्स डे’च्या दिवशी हा विषय चर्चेचा ठरला.
रविवारी मध्यरात्री उपेंद्रनगर येथे टिप्पर गँगचा सदस्य सराईत गुन्हेगार अजिंक्य संजय चव्हाण हा टोळीचे खंदे समर्थक असलेल्या चार संशयितांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाला. दोन गोळ्या लागल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी दुपारी १२ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी रात्रीच संशयितांचा माग काढला. सिन्नर रस्त्यावर पाठलाग करून घटनेनंतर सहा तासांतच संशयितांच्या सिन्नरमध्ये पाेलिसांनी मुसक्या आवळल्या. चौकशीमध्ये अमोल जाधव, गोरख वऱ्हाडे, रवींद्र मुकुंद रणमाळे (तिघे रा. सिन्नर) आणि प्रदीप सर्जेराव जायभावे (रा. आडगाव) अशी नावे संशयितांनी सांगितली. संशयित सिन्नरमध्ये वाळू व्यावसायिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपआयुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त सचिन गोरे, अतुल झेंडे, डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, दिनेश बर्डेकर, उपनिरीक्षक महेश इंगोले यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात टोळीतील आणखी संशयितांची नावे निष्पन्न झाले आहेत. त्यांच्या मागावर पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे.

तडीपार गुन्हेगारांचे हत्या सत्र : अजिंक्यचव्हाण यास २२ जानेवारी राेजी तडीपार करण्यात आले होते. चव्हाणवर गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत. घटनेच्या दिवशी तो शहरात होता. टोळीच्या सदस्यांसोबत वाद झाल्यानंतर त्याचा खून करण्यात आला. अशाच प्रकारे जानेवारीला अर्जुन आव्हाड, निखिल गवळे या दोघांचा खून झाला. या दोघांवर तडीपारीची कारवाई झालेली हाेती.

कारागृहात हलले सूत्र ?
टिप्पर गँगचे सर्वच सराईत गुन्हेगार कारागृहात आहे. तरीही अंबड भागात टिप्पर गँगच्या समर्थकांची भाईगिरी सुरूच आहे. मृताकडून गँगची सूत्र हाती घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची भनक कारागृहातील भाईंना लागली होती. या वर्चस्वाच्या वादातून कारागृहातील भाईंच्या इशाऱ्यावर ही हत्या झाल्याचा संशय पोलिस सूत्रांनी व्यक्त केला आहे.
बातम्या आणखी आहेत...